गोव्यात मुलींना सुरक्षित वाटतंय का?

गोव्यातील मुलींना नेमकं काय वाटतंय? काही मोजक्या प्रतिक्रिया

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः काही काळापूर्वी महिलांसाठी सुरक्षित असणाऱ्या राज्यांमध्ये गोवा पहिल्या क्रमांकावर होता. मात्र मागच्या काही महिन्यांमध्ये महिलांच्या बाबतीत गोव्यात घडलेल्या घटना पाहता खरंच गोवा महिलांसाठी सुरक्षित राहिलाय का? असा प्रश्न सामाजाच्या विविध स्तरातून सातत्याने विचारला जातोय. मागच्या काही महिन्यांच्या गोष्टी कशाला, आत्ता अगदी आठवड्याभरापूर्वी घडलेलं, ताजं असलेलं प्रकरण म्हणजे नास्नोळ्यातील सिद्धी नाईक हिचा अत्यंत गुढ पद्धतीने झालेला मृत्यू.. या प्रकरणानंतर गोव्यात मुलींना सुरक्षित वाटतंय का? हा प्रश्न अधिक गडद होत गेलाय. गोव्यातील मुलींना नेमकं काय वाटतंय? या आणि अशा काही मोजक्या प्रश्नांवर आपली मतं मांडताना युवतींनी त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

गुन्हेगारांना जरब बसेल असे कडक कायदे बनवण्याची गरजः डॉ. विभा लाड

होय! सध्या गोव्यात महिला-मुली सुरक्षित नाहीत. आज गोव्यात कायदे कडक करण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यातील महिलांविषयी घडलेल्या दुर्दैवी घटना पाहता असं जाणवतंय की गुन्हेगारांना कशाचीच भीती राहिलेली नाही. ज्या गोव्यात महिला स्वत:ला सुरक्षित समजत होत्या, तिथे महिला सध्या प्रचंड दहशतीखाली वावरताना दिसतायत. तेव्हा माझं असं स्पष्ट मत आहे, महिलांची सुरक्षा गंभीरपणे घेऊन गुन्हेगारांना जरब बसेल असे कडक कायदे बनवण्याची गरज आहे.

पालकांनी मुलांवर योग्य संस्कारा करण्याची गरजः स्वरदा शेखर पणशीकर

आपण आपल्या भारत देशाचा, आपल्या परंपरेचा जयजयकार करताना कायमच स्त्रीशक्तीचा आदर करत आलोत. ज्या देशात दरवर्षी नऊ दिवस आपण देवीचं पुजन करतो, त्याच देशात देवीचं स्वरूप असलेली स्त्री रात्रीच काय, तर दिवसाच्या लख्ख प्रकाशातही सुरक्षित नाही. ही बाब अतिशय लज्जास्पद आहे. खरंतर केवळ गोवाच नाही, तर आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात महिलांप्रती अत्याचाराच्या घटना सर्रास घडत असतात, परंतु फारच कमी वेळा समाजात त्या उघडकीला येतात. आपण कायम म्हणतो, की या गोष्टींचा होणारा अतिरेक थांबवण्यासाठी किंवा स्त्रीला समाजात सुरक्षितता मिळावी यासाठी घरातील मुलांवर योग्य वयात, योग्य संस्कार व्हायला हवेत. अगदी खरं! परंतु मला आणखीन काहीतरी सांगावसं वाटतं. मुलींवर/महिलांवर होणारे अत्याचार पाहता, सध्याची गंभीर परिस्थिती समजून घेऊन पालकांनीसुद्धा आपली मुलं-मुली काय करतात, याकडे कडक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. घरातील मुलामुलींना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक कळलाच पाहिजे. सूट-सवलत देण्याच्या नावाखाली मुला-मुलींना हवं तसं वागायला देणं, रात्री-अपरात्री घरी येणाऱ्या पाल्यांची विचारपुसही न करणं, मुलं शाळा-कॉलेजला/कामाला जातात असं सांगुन नक्की कुठे जातात याची खातरजमा न करणं, मुलं कुणाच्या संगतीत आहेत याची माहिती न ठेवणं इ. गोष्टींमुळे आपण पुढच्या पिढीचं नुकसान करत आहोत हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. बलात्कार, खून यासारखे अमानुष प्रकार आजुबाजुला घडत असताना आपल्या मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकांनी तिच्यावर योग्यप्रकारे लक्ष ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. काही लोकं म्हणतील की मुलींवर लक्ष ठेवून, तिच्यावर बंधनं घालण्यापेक्षा मुलांवर संस्कार करा! हे खरं असलं तरी संस्कार एका दिवसात पूर्ण होत नाहीत. आजच्या पालकांनी जर मुलामुलींवर योग्य संस्कार केले, तर आणि तरच पुढची पिढी या अमानवी कृत्याला बळी पडण्यापासून ‘कदाचित’ वाचेल असं मला वाटतं!

स्वसुरक्षिततेसाठी महिलांना तयार करण्याची गरजः मकसबी माळगीमनी

गोवा राज्य हा आपल्या संस्कृतीसाठी आणि विविधतेसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून महिलांना समाजात आदर दिला जात आहे. परंतु आज आपल्या समोर महिलांवर होणारे अत्याचार जास्त प्रमाणात दिसून येतात. या सर्व कारणांमुळे महिला आज असुरक्षित बनल्यात. आज महिलांचं संरक्षण करण्यासाठी सरकारने महिला सबलीकरणाला सर्वात जास्त प्राधान्य दिलं आहे. महिलांची सुरक्षा ही एक गंभीर समस्या गोव्यात निर्माण झाली आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. कायद्याने दोषींना कठोर शिक्षा करावी लागेल, जेणेकरून एखादा महिलांशी गैरवर्तन करण्याआधी एक हजार वेळा विचार करेल. महिलांना स्वतःच्या सुरक्षेसाठी तयार करावं लागेल. महिला सुरक्षिततेच्या बाबतीत गोवा सरकारने कठोर कायदे आणि नियम तयार करावे लागतील.

प्रत्येक मुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवाः वैष्णवी रघुनाथ जोशी

देशात देवीची मनोभावे पूजा केली जाते, जिच्यासमोर आपण नतमस्तक होतो, त्याच देशात आज स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून खरंच आपल्या देशासारखा दुसरा दुर्दैवी देश नाही, असंच वाटतं. प्रगती पथावर वाटचाल करताना जर आपल्या घरातील लक्ष्मीच सुरक्षित नसेल, तर अशा प्रगतीचा उपयोग तो काय? खरंतर या परिस्थितीला आपण सगळेच जबाबदार आहोत. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीला आपल्यापैकी प्रत्येकजण या ना त्या पद्धतीने खतपाणी घालत असतो. बदल घडायला हवा असेल, तर तो आपल्या घरातून व्हायला हवा. प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे, त्यांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीला माझी विनंती आहे, की तिने आर्थिक आणि शारीरिकरित्या सबल व्हावं. स्वतःच्या पायावर उभं राहताना स्वरक्षणाचे धडेही गिरवावेत. जेणेकरून तिला खऱ्या अर्थाने कुणीची गरज भासणार नाही. ती खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल.

मुली-महिलांना स्वरक्षणासाठी तयार कराः सिंथिया गावकर

महिलांसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राज्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गोव्यात आज बलात्कार पीडितांची संख्या शंभरवर पोहोचली आहे. आज गोव्यातील स्त्री दिवसाची घरातून बाहेर पडायला घाबरतेय. मी सरकारला आज प्रश्न विचारू इच्छिते की जेव्हा गोव्यात पहिल्यांदाच महिलेवर अत्याचाराची घटना घडली, तेव्हा त्या नराधमाला फाशी देण्याचा आदेश का नाही दिला गेला? आज पालक आणि मुलांमधला संवाद संपत चालला आहे. आजकालची मुलं स्वतःची सुखदुःख आपल्या आईवडिलांसोबत शेअर करायला धजतात. हे अंतर स्वतः पालकांनी आपल्या मुलांबरोबर वेळ घालवून भरलं पाहिजे. मुलींना किंवा महिलांना आज स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिकवलं पाहिजे.


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!