पशुसंवर्धन खात्याची दूध, पोल्ट्री वाढीसाठीसाठी घोडदौड

'स्वयंपूर्ण' योजनेंतर्गत ६,४१० कोंबड्या, ३५३ गायींचं वाटप; शेतकऱ्यांचाही प्रतिसाद

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी: आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा योजनेंतर्गत राज्यातील पोल्ट्री आणि दूध व्यवसाय वाढविण्यासाठी पशुसंवर्धन खात्याने कंबर कसली आहे. खात्याने ग्रामशक्ती योजनेंतर्गत गेल्या काही महिन्यांत ६,४१० कोंबड्यांचं मोफत वाटप केलंय. तर कामधेनू योजनेमार्फत ३५३ जणांना गायींचं वाटप केलंय. आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांना आणखी २१२ गायी देण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे संचालक आगुस्तिनो मिस्किता यांनी दिली.

हेही पहाः ILLEGAL COMPOUND |बिल्डरची दादागिरी, आश्वे किनारी कुंपण

हेही पहाः Railway | रेल्वेचे दोन डबे रूळावरून घसरले

पोल्ट्री व्यवसायाला चालना देण्यासाठी….

राज्याला पोल्ट्री व्यवसायाला चालना देऊन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारने काही महिन्यांपूर्वी ग्रामशक्ती योजना सुरू केली. योजनेंतर्गत प्रत्येकाला दहा कोंबड्या आणि दोन किलो खाद्य असं एक युनिट मोफत देण्यात येतं. योजनेसाठी गेल्या काही महिन्यांत खात्याकडे ३,४८३ अर्ज आलेत. त्यातील ३,२१२ अर्जांवर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात १,४०२ अर्जांना मंजुरी देण्यात आली आणि त्यातील ६४१ जणांना प्रत्येकी दहा अशा ६,४१० कोंबड्या देण्यात आल्या. बहुतांशी कोंबड्या महाराष्ट्र, कर्नाटकातून आणल्या जातात. पण सध्या बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांवर बंदी घालण्यात आल्याने कोंबड्यांची आयात करणं तूर्त थांबवलंय. पण, बंदी उठताच उर्वरित ७६१ जणांनाही कोंबड्यांचं वितरण करण्यात येईल. शिवाय इतर अर्जांनाही मंजुरी देण्यात येणार असल्याचं संचालक मिस्किता यांनी सांगितलं.

गोव्यात धवलक्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न

दरम्यान, २०१९-२० मध्ये पशुसंवर्धन खात्याने कामधेनू योजनेंतर्गत १,३५४ गायी व म्हशींचं वाटप केलं होतं. पण, मार्च २०२० नंतर गोव्यासह देशभरात करोनाची लाट आल्याने पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक येथून गायी, म्हशी आणण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत २१८ जणांचे अर्ज आले होते. त्यातील २१२ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. अर्जदारांना गायींचा पुरवठा करण्यासाठी लुधियाना (पंजाब) येथून गायी आणण्याची प्रक्रिया सुरू झालीये. पालिका निवडणुकीची आचारसंहिता संपताच अर्जदारांना गायींच वाटप केल जाईल. या गायी दिवसाला ३० ते ३५ लिटर दूध देतात. राज्यातील शेतकरी तसंच युवा वर्गाने या गायींचं पालन करून स्वत:चा आर्थिक विकास साधण्यासह गोव्यात धवलक्रांती घडवून आणावी, यासाठी खाते प्रयत्नशील आहे, असं ते म्हणाले.

इतर योजनांनाही पशुसंवर्धन खात्यातर्फे गती

कामधेनूसह कुक्कुटपालन, वराह पालन, गोठा, हिरवा चारा, दूधासाठीच्या मशीन्स यासंदर्भातील योजनांनाही खात्याने गती दिली आहे. वराह पालन योजनेंतर्गत डुकराच्या ५३३ पिलांचं गेल्या काही महिन्यांत वाटप करण्यात आलं आहे, अशी माहितीही मिस्किता यांनी दिली.

जागृतीमुळे ४,०९४ शेतकरी योजनांकडे आकर्षित

आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा योजनेंतर्गत राज्यातील १९१ पंचायतींत खात्याने आतापर्यंत ९४३ जागृती कार्यक्रम केले. दूध उत्पादन वाढीसाठी १,१६१ डेअरींना भेटी दिल्या. पंचायतींना २८२ वेळा भेटी देऊन त्यांचा आढावा घेतला. खात्याने जागृतीसाठी घेतलेल्या कार्यक्रमांना ४,०९४ शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळालाय. ग्रामीण भागांतील शेतकरी पशुपालन खात्याच्या योजनांकडे आकर्षित होतायत. त्यामुळे गोव्याचं धवलक्रांतीचं स्वप्न लवकरच साकार होऊ शकतं, असा विश्वास आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा योजनेतील पशुसंवर्धन खात्याचे राज्य नोडल अधिकारी तथा खात्याचे उपसंचालक डॉ. प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.

बेरोजगारांच्या प्रशिक्षणावर भर

  • १८ ते २४ वयोगटातील बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यावर खात्याने भर दिलाय. गेल्या काही महिन्यांत त्यांच्यासाठी विविध ठिकाणी डेअरीसंदर्भातील आठ प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. त्यात १२७ जणांना प्रशिक्षण देण्यात आलं असून, प्रशिक्षित युवकांना ९० टक्के अनुदानाने जास्तीत जास्त दहा गायी देण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. प्रशांत नाईक यांनी दिली.
  • ऑक्टोबर २०२० ते आतापर्यंत वराहपालनाचे दोन प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन त्यात ६० जणांना प्रशिक्षित करण्यात आलं. याशिवाय पोल्ट्रीसंदर्भात दोन कार्यक्रम घेऊन ६० जणांना, गोठ्याबाबत तीन कार्यक्रम घेऊन ७६ जणांना, तर डेअरीबाबत पाच प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन १४० जणांना प्रशिक्षण देण्यात आलं, असंही नाईक यांनी सांगितलं.

हेही वाचाः ‘स्मार्ट व्हिलेज’मुळे कृषी क्षेत्रात येऊ शकते नवचैतन्य

हेही वाचाः Video | कणकिरे-गुळेलीला वादळाचा तडाखा, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्यं

हेही वाचाः मिरची झाली गोड! तीन महिन्यात शेतकऱ्यानं असे कमावले 7 लाख

हेही वाचाः साट्रे सत्तरीत स्ट्रॉबेरीचं उत्पादन यशस्वी, युवा शेतकरी श्याम गांवकरांची किमया

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!