भाजपचे असंतुष्ट आमदार मगोच्या संपर्कात!

सुदीन ढवळीकर : निवडणुुकीत भाजपचे संख्याबळ घटणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: सत्ताधारी भाजपचे आमदार सरकार तसेच पक्षाच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. या सरकारमधील काही असंतुष्ट आमदारांनी आपली भेट घेतली असून अनंत चतुर्थीनंतर राज्याच्या राजकारणांत मोठा बदल होणार अाहे, अशी माहिती मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचाः एनसीबीची गोवा, मुंबईत मोठी कारवाई

यावेळी आमदार ढवळीकर यांनी सरकारच्या गैरकारभाराविषयी सांगताना त्यांनी राजकीय स्थितीची कल्पना दिली. मागील आठवड्यात मंत्री मायकल लोबो यांनी ढवळीकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी ही सदिच्छा भेट असल्याचं ढवळीकर यांनी स्पष्ट केलं होतं.

भाजपात बराच असंतोष

भाजपात बराच असंतोष आहे. सरकारच्या कामगिरीवर लोक खूश नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदारांना याचा फटका बसू शकतो. त्यासाठी भाजपच्या काही असंतुष्ट आमदारांनी आपली भेट घेतली होती. सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील बरीच कामं प्रलंबित आहेत. अनंत चतुर्थी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणांत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भाजपात जी अंतर्गत धुसफूस आहे, ती चतुर्थीनंतर दृष्टीस पडणार आहे. सर्व पातळीवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दुहेरी आकडाही गाठण्याची शक्यता नाही. २०१७च्या निवडणुकीत ‍भाजपला १३ सीट मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी १३ जागा मिळण्याची शक्यता नसल्याचे भाकित त्यांनी केले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मगो पक्षाची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. चतुर्थीनंतर युतीविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या सर्व मतदारसंंघांत पक्षाची तयारी सुरू आहे.

हेही वाचाः अवघ्या 3 तासांत मुंबई-सिंधुदुर्ग हे अंतर पार करता येणार?

३५० कोटींची बिले प्रलंबित

कंत्राटदारांची ३५० कोटींची बिलं प्रलंबित आहेत. राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे कंत्राटदारांना वेळेत पैसे मिळत नाहीत. सरकारने कंत्राटदारांची बिले प्राधान्याने देणं आवश्यक आहे. राज्यातील हॉस्पिटल्सची कामं अर्धवटस्थिती आहेत. त्याबरोबरच काही प्रमुख प्रकल्पही प्रलंबित आहेत. ‍करोनामुळे राज्यातील बेकारीतही वाढ झाली आहे. चक्रीवादळामुळे ज्या घरांचे नुकसान झाले होते, त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसंच शेतकऱ्यांनाही अद्याप पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे. या सर्व प्रलंबित कामांचा आगामी निवडणुुकीत फटका बसणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः Crime | शिवीगाळ करुन पत्नीला धमकी देत मारहाण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!