घरांना 100 टक्के नळजोडणी पुरवणारे पहिले राज्य हा ‘जुमला’!

म्हापसा परिसरात 30 दिवस नळ कोरडे : दिगंबर कामत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यातील ग्रामीण घरांना 100 टक्के नळ जोडणी पुरवणारे गोवा हे “हर घर जल’ योजनेतील पहिले राज्य असल्याचा केंद्रिय जल शक्ती मंत्र्यांचा दावा म्हणजे भाजपचा जुमला होता. म्हापसा व परिसरातील नळ मागचे सलग 30 दिवस कोरडे राहिल्याने हे परत एकदा उघड झाल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली.

प्रत्येक गोमंतकीयाने दक्ष राहणे गरजेचे!

प्रत्येक गोमंतकीयाने म्हादईचा एकही थेंब वळविला जाणार नाही यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे, असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. म्हापसा, शिवोली व परिसरातील लोकांना मागील कित्येक महिने व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसुन पाणी न येणे वा नळातून गढुळ पाणी येण्याची समस्या त्यांना ग्रासत आहे. मागील 30 दिवस तर नळात पाण्याचा थेंबही न येणे हे धक्कादायक आहे. सरकार लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरले आहे, असे दिगंबर कामत म्हणाले.

गोमंतकीयांच्या जखमेवर मिठ..!

केंद्रिय जलशक्ती मंत्र्यानी ताबडतोब गोव्याला भेट द्यावी व सत्य परिस्थीती जाणुन घ्यावी. केंद्रिय मंत्र्यांची घोषणा म्हणजे अनियमीत पाणी पुरवठ्याने त्रस्त शहरातील रहिवासी व खेड्यात राहणाऱ्या व विहीरीचे पाणी वा जवळच्या नदी- ओहोळातील पाणी आणुन आपली गरज भागवणाऱ्या गोमंतकीयांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे, अशी टिका दिगंबर कामत यांनी केली आहे.

नवीन शौचालयांची खरेदी का?

गोवा राज्य हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली होती. आजही अनेक ठिकाणी शौचालये उपलब्द नसल्याने लोक उघड्यावर शौचास जातात. गोवा शंभर टक्के हागणदारी मुक्त झाला असल्यास सरकार अजुनही नवीन शौचालयांची का खरेदी करत आहे, असा सवाल मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना दिगंबर कामत यांनी केला आहे.

आज गोमंतकीय जनता भाजप सरकारच्या लोक विरोधी व असंवेदनशील कारभाराला कंटाळली असुन, लवकरच लोक भाजपला योग्य धडा शिकवतील, असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!