अर्धवेळ राज्यपाल कोविड हाताळणीवर कसे लक्ष देणार?

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोव्याचे अर्धवेळ राज्यपाल कोविड हाताळणीवर कसं लक्ष ठेवणार आणि जनतेला कसा न्याय देणार, हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी स्पष्ट करावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केलीय. त्याचबरोबर संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून गोव्यात ताबडतोब पूर्णवेळ राज्यपालाची नेमणूक करावी, अशी मागणीही कामत यांनी केलीय.
देशात खालावत चाललेल्या कोविड हाताळणीसाठी लष्कराची मदत घेणं योग्य असल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या ध्यानात आलं, ही चांगली गोष्ट आहे, असं कामत म्हणाले. राजनाथ सिंग यांनी विविध राज्यांचे राज्यपाल आणि संघप्रदेशांच्या नायब राज्यपालांबरोबर बैठक घेऊन त्यांना कोविड हाताळणीसाठी लष्करातील माजी सैनिक अधिकारी, नर्सेस तसच इतरांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना दिगंबर कामत यांनी ही मागणी केलीय.
राज्य सरकार अपयशी!
गोव्यासाठी अर्धवेळ राज्यपाल आहेत. त्यांच्यावर कोविडचा उद्रेक झालेल्या महाराष्ट्राचीही जबाबदारी आहे. गोव्याचं भाजप सरकार दिशाहीन झालंय आणि या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे कसलीच उपाययोजना नाही. या परिस्थितीत अर्धवेळ राज्यपाल कसा काय गोव्याला न्याय देणार, असा प्रश्न कामत यांनी विचारलाय.
पंतप्रधानांकडे मागणी केली, पण…
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 23 मार्च 2020 रोजी देशातील कोविड हाताळणीसाठी समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञ आणि लष्कराचे तज्ञ यांचा समावेश असलेल्या कृती दलाची स्थापना करण्याची मागणी केली होती. परंतु मागील एक वर्ष सरकारने आमच्या सुचनेवर कसलीच कृती केली नाही, असं कामत म्हणाले. गोव्यात सरकारी बेजबाबदारपणामुळे कोविडने महाभयंकर रूप धारण केलंय. दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढतेय. मृतांच्या आकडेवारीत वाढ होतेय. लोकांना कोविडच्या जबड्यात ढकलून भाजप सरकार गप्प आहे, असा आरोप कामत यांनी केलाय.
राज्यात अराजक माजण्यासारखी परिस्थिती!
राज्यात सर्वत्र गोंधळाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये कसलाच समन्वय नाही. अधिकारी गोंधळलेले आहेत. आता काही स्थानिक पंचायतींनी परस्पर लॉकडाऊन घोषित केलंय. राज्यात अराजक माजण्यासारखी परिस्थिती आहे, असा इशारा दिगंबर कामत यांनी दिलाय.
सत्यपाल मलिक हवे होते…
राज्यातील भाजप सरकार विरोधकांनी केलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करतंय. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यपालांकडे दाद मागण्याचा विचार केल्यास ते पूर्णवेळ उपलब्ध नसतात. आज गोव्याला माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांची उणीव भासतेय, असं कामत म्हणाले. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नेहमीच गोमंतकीयांच्या हिताचा विचार केला. म्हादई, मांगोर हिल लॉकडाऊन, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अशा महत्त्वांच्या विषयांवर त्यांनी गोव्याची बाजू उचलून धरली. हल्लीच शेतकरी आंदोलनावरही त्यांनी सडेतोड विचार मांडून सरकारला जाब विचारण्याची हिंमत दाखवली. गोव्यात अधिक काळ राहिल्यास बेजबाबदार भाजप सरकारची नाचक्की होणार हे लक्षात आल्यानंच त्यांची बदली करण्यात आली.