28 तारखेला दीदी गोव्यात! विरोधी पक्षांना उद्देशून ममता म्हणाल्या की…

भाजपला हरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : अखेर ममता बॅनर्जी यांनी गोव्यात येण्याचा मुहूर्त नक्की केलाय. येत्या 28 तारखेला त्या गोव्यात येणार आहेत. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना महत्त्वाचं आवाहनही केलंय.

राज्यात सत्ताधारी भाजपसमोर सगळेच विरोधक ढेपाळल्याचे चित्र तयार झाले असतानाच आता अचानक तृणमूल काँग्रेस पक्षाने राज्यात प्रवेश करून सगळे राजकीय वातावरणच ढवळून काढले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अंतर्गत लाथाळ्यांनी पूर्णपणे पोखरून टाकले आहे. स्थानिक प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करण्याबाबतही काँग्रेसकडून निरूत्साह दाखवण्यात येत असल्याने तृणमूल काँग्रेसने सत्ताधारी भाजप विरोधातील वातावरणाला बळकटी मिळवून देण्याच्या प्रयासांना आता यश मिळत असल्याचे चित्र तयार झाले आहे.

भाजपच्या विजयी रथाला यशस्वीपणे पच्छिम बंगालात रोखून सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः ट्वीट करून आपल्या 28 ऑक्टोबर रोजीच्या भेटीची माहिती दिली आहे. या संदेशात त्यांनी सर्व विरोधकांना एकजुटीने भाजप विरोधात उभे राहण्याचे आव्हान केले आहे. समाज, धर्म, ज्ञातीमध्ये भेद निर्माण करणाऱ्या राजकारणाला अजिबात थारा देता कामा नये,असेही त्यांनी ह्यात म्हटले आहे.

तिसऱ्या आघाडीचे संकेत

राज्यात भाजप विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसने बनवला आहे. काँग्रेसकडून इतरांना विश्वासात घेतले जात नाही तसेच इतर विरोधी घटकांनाही विचारात घेतले जात नसल्याने आता त्यासाठी तृणमूल काँग्रेसने पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. भाजपला रोखणे हे अंतीम ध्येय डोळ्यांसमोर ठेवून यासाठी वावरणाऱ्या सर्व घटकांना एक छत्राखाली आणण्याचा संकल्प ममता बॅनर्जी यांनी ठेवला आहे. सध्या तृणमूल काँग्रेसची गोवा फॉरवर्डकडे चर्चा सुरू आहे. या व्यतिरीक्त मगो, आप तसेच अन्य पक्षांसोबतही चर्चा केली जाईल,अशी माहिती पक्षाच्या सुत्रांनी दिली. ऑक्टोबर महिन्याची अखेर या गोव्याच्या राजकारणात अनेक बदल घडवून आणणारी ठरू शकते,असेही स्पष्ट संकेत मिळत आहेत.

28 तारखेला होणार शक्तिप्रदर्शन

एकीकडे तृणमूलच्या राज्यातील नेत्यांनी आपली ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्यात. तर दुसरीकडे आता ममता बॅनर्जी यांनीही आपल्या गोव्यात येण्याची तारीख नक्की केलीये. येत्या 28 ऑक्टोबरला ममता बॅनर्जी गोव्यात दाखल होतील. तृणमूलच्या एकूणच सगळ्या घडामोडींनंतर ममता बॅनर्जी यांची ही पहिलीच गोवा व्हिजिट असणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या या पहिल्या वाहिल्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूलकडूनही जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या या दौऱ्यादरम्यान जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, ट्वीट करत ममता बॅनर्जी यांनी आपण गोव्यात येत असल्याचं स्पष्ट केलंय.

यावेळी भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलंय. गेल्या 10 वर्षांपासून गोवा अनेक गोष्टी भोगतोय. नव्या आघाडीतून नवी सकाळ उजाडण्याची गरज ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला, तर आश्चर्य वाटायला नको.

लवकरच राहुल गांधीही येणार!

तृणमूल काँग्रेस गोव्यात आल्यापासून राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. तृणमूलने काँग्रेसला फोडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले आहेत. काँग्रेसमधून फुटून गेलेल्या लुईझिन फालेरो यांनी काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना तृणमूल घेण्यावर जोर दिलेला आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसला पुन्हा खिंडार पडण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील महिन्याच्या अखेरीस गोव्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राहुल गांधी प्रदेश काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्यांची बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये बैठक घेणार आहेत. सक्रिय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून येत्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठीच हा दौरा असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!