देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल, काय असणार गोव्यासाठी रणनिती?, दुपारनंतर कळणार

गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर पहिलाच दौरा

Goan Varta Live | प्रतिनिधी

दाबोळी : भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे गोव्यात दाखल झालेत. आजपासून ते गोव्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान, यावेळी त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देणं टाळलंय. दुपारनंतर सविस्तर पत्रकारांशी बोलणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Maharashtra-BJP-leader-Devendra-Fadnavis-770x433

राजकीय घडामोडींना वेग

दरम्यान, गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक झाल्यानंतरचा फडणवीसांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात फडणवीस भाजपच्या राज्यातील नेतृत्त्वासोबतच इतरही कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये जोरदार कामगिरी करुन दाखवल्यानंतर फडणवीस यांना आता भाजप हायकमांडनं गोव्याच्या मोहिमेवर पाठवलंय. त्यामुळे यावेळी गोव्यात भाजपची रणनिती नेमकी काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी काही काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. निवडणुकीची रणनिती ठरवण्यासोबतच अंतर्गत गटबाजी रोखण्याचं आव्हानही राज्यातील भाजपसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या दौऱ्यात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. फडणवीस आपल्या या दौऱ्यात कुणाच्या गाठीभेटी घेतात, कुणासोबत चर्चा करतात, याकडे संपूर्ण राज्याची नजर लागलेली आहे.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद हे भाजपचा 2022साठीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहे, हे भाजपनं आधीच स्पष्ट केलं आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या कॅम्पेनिंगलाही सुरुवात झालेली आहे. अशातच बुधवारी भाजपच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा निर्णय हायकमांडने घेतलाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती गोवा भाजपने निवडणूक प्रभारी म्हणून केली आहे. दरम्यान, ही निवड तसं पाहायला गेलं, तर अपेक्षितच होती. कारण फडणवीस आणि सावंत यांनी याआधीही एकमेकांना मदत करण्यासाठी सोबत केली आहे. या आहेत त्याच संदर्भातल्या काही इंटरस्टिंग गोष्टी.

गोष्ट क्रमांक 1

तारीख 14 ऑक्टोबर 2019. तेव्हा प्रमोद सावंत हे गोव्यात तर फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. दरम्यान, मुंबईत मरीन ड्राईव्हवर एका मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी फडणवीसांच्या सोबत डॉ. प्रमोद सावंतही दिसून आले होते. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस पुन्हा एकदा निवडणून येतील, महाराष्ट्राची जनता भाजपला भरघोस मतदान करेल, असा विश्वास त्यांनी या मॉर्निंग वॉकनंतर व्यक्त केला होता.

2019च्या ऑक्टोबर महिन्यापासूनच खरंतर तेव्हा महाराष्ट्राचं राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोर धरु लागलं होतं. अखेर निवडणुका झाल्या. जोरदार प्रचार भाजपनं केला. आपली सर्व शक्ती पणाला लावली. फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या निवडणुकांमध्ये भाजपनं 105 जागा जिंकल्याही. पण सत्ता स्थापन करताना शिवसेनेसोबत झालेल्या वाटाघाटींमुळे राजकारण ताणलं गेलं. अखेर अजित पवारांसोबत हातमिळवणी करत फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदी आले खरे. पण ते सरकार फार काळ टिकू शकलं नाही. त्यामुळे सर्वाधिक आमदार निवडणून आणूनही महाराष्ट्रात भाजपाल सत्तेपासून दूर राहण्याची वेळ ओढावली.

महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल काहीही लागलेला असू दे. पण फडणवीस यांच्या प्रचारासाठी आणि त्यांना सोबत करण्यासाठी वेळोवेळी प्रमोद सावंत यांनी सहकार्य केल्याचं या मरीन ड्राईव्हवरील मॉर्निंग वॉकवरुन दिसून आलेलंय.

गोष्ट क्रमांक 2

2019मध्ये फडणवीस आणि प्रमोद सावंत यांच्यात चांगला संपर्क होता. हे दोन्ही नेते एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवणा करताना दिसून आलेले आहोत. ५ एप्रिल 2019ला फडणवीस आणि प्रमोद सावंत यांच्यात नागपुरात भेट झाली होती. यावेळी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत महत्त्वाची चर्चा केली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं कशाप्रकारे घसघशीत विजय मिळवला, हे संपूर्ण देशानेच पाहिलं होतं. या भेटीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुका कशा लढवायला हव्या, याबाबत चांगलं ट्युनिंग असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे आता प्रभारी म्हणून झालेली फडणवीसांची निवड आणि मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी काय काय करायला हवं, याचा या दोन्ही नेत्यांना एकमेकांच्या अनुभवातून फायदा होईल का, हे देखील गोष्ट पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गोष्ट क्रमांक 3

तो दिवस होता 10 ऑगस्ट 2020. याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्यात भेट झाली होती. ठिकाण होतं, आल्तिनो-पणजी. वेगवेगळ्या विषयांवर यावेळी मुख्यमंत्री आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या यावेळी चर्चा झाली होती. कोरोना व्हायरसच्या महामारीतून गोवा राज्य तेव्हा हळूहळू सावरु लागलं होतं. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चेसोबत इतरही अनेक गोष्टींवर गुफ्तगू झालं नसेल, अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे ही भेट देखील महत्त्वाची आहे.

गोष्ट क्रमांक 4

2019च्या 22 ऑगस्टची ही गोष्ट आहे. ३ राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एकत्र पणजीत एका व्यासपिठावर दिसले होते. यावेळी तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील सोबत होते. या भेटीत भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह यांनीही प्रमोद सावंत आणि फडणवीस यांना एकत्र एक कामगिरी दिली, तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, याची पुसटशी कल्पना आली नसेल कशावरुन? गोव्यातच झालेल्या या कार्यक्रमात फडणवीसांनाही आपण गोव्याचे भाजप निवडणूक प्रभारी होऊ असं वाटलं नसेल.

एकूणच वरचेवर देवेंद्र फडणवीस आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्या संपर्क होत असतो, हे या चार इंटरेस्टिंग गोष्टींवरुन दिसून येतं. या दोन्ही नेत्यांनी एकत्र काम केल्यास आगामी निवडणुकीता भाजपला गोव्यात फायदा होईल, अस हायकमांडला वाटल्यानंच फडणवीसांना गोव्याच्या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय झाला असण्याची शक्यता जास्त आहे. त्यापार्श्वभूमीवर आता येत्या काळात हे दोन्ही नेते भाजपचा विस्तार करण्यासाठी गोव्यात काय रणनिती आखतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!