खाण अवलंबितांची ताकद सरकारला दाखवण्याचा निर्धार

लिलाव झाल्यास खनिज व्यवसाय लवकर सुरू होणे अशक्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: खाणी सुरू करण्याबाबत सरकार केवळ तारखाच देत आहे. खण अवलंबितांचा संयम आता ढळत आहे. आपली ताकद सरकारला दाखवण्याची वेळ आली आहे. खाणी सुरू झाल्या नाहीत तर १६ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळ ट्रक आणि मशिनरी आणून ठेवण्याचा इशारा गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटच्या बैठकीत देण्यात आला. फ्रंटची बैठक गुरुवारी सायंकाळी सावर्डे येथे झाली. फ्रंटचे संघटक पुती गावकर, बार्जमालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

खाणी सुरू करण्याबाबत निर्णय न झाल्यास…

खाण अवलंबितांना सरकार गृहित धरते. खाण बंदीला तीन वर्षं पूर्ण होत आहेत. खाणी सुरू करण्याबाबत निर्णय न झाल्यास १६ मार्च रोजी ट्रक, मशिनरी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यानजीक ठेवायच्या आणि कर्ज व अन्य कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना सादर करायची. खाण अवलंबितांसाठी सरकारने पेन्शन योजना सुरू करावी, अशी मागणीही यावेळी केली जाईल, असं पुती गावकर यांनी सांगितलं.

राज्यातील खाणी सुरू करणं शक्य

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा विचार केला असता गोव्यातील खनिज व्यवसाय सुरू करणं शक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाणींचं सेकंड रिन्यूअल रद्द ठरवलं. मायनिंग कन्सेशन अ‍ॅन्ड  अ‍ॅबोलिशन कायदा १९८७ पासून लागू करावा. लीजाचा कालावधी ५० वर्षांचा धरल्यास २०३७ पर्यंत लीज सुरू राहतील. हा कायदो लागू करण्याची इच्छाशक्ती सरकारकडे असणं आवश्यक आहे. उडिशा तसंच अन्य राज्यांत लीजांचा लिलाव झाला. लिलाव होऊनही तेथील खाणी सुरू झालेल्या नाहीत. सरकारलाही अपेक्षित अशी बोली मिळालेली नाही, असं पुती गावकर यांनी सांगितलं. यावेळी सूर्या नाईक, चंद्रकांत गावस यांचीही भाषणं झाली.

जमीन मालकीच्या हक्कासाठी ४० हजार कोटी हवेत

लिलाव झाल्यास जमिनीची मालकी हक्क सरकारकडे असणं गरजेचं आहे. गोव्यात जी लीजा आहेत, त्याचे मालकी हक्क एक तर खण कंपन्यांकडे किंवा अन्य लोकांकडे आहेत. अन्य राज्यांत जमिनीचे मालकी हक्क सरकारकडे आहे. लिलाव करा किंवा नका करू, त्याविषयी आम्हाला काहीच म्हणायचं नाही. जमीन मालकीच्या हक्कासाठी ४० हजार कोटी रुपये हवेत. लिलाव झाल्यानंतर खाणी लवकर सुरू होणं अशक्य असल्याचं बार्जमालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!