विदेशी युवतीची पुन्हा स्थानबद्धता केंद्रात रवानगी

शिक्षा पूर्ण होऊन झाली होती सुटका; पासपोर्टअभावी पुन्हा अटक

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: येथील स्थानबद्धता (डिटेन्शन) केंद्रातील दोघा महिला पोलिसांना शिवीगाळ केल्या प्रकरणी शिक्षा भोगून तांझानियाच्या युवतीची सोमवारी मुक्तता झाली. पण मायदेशी परतण्यासाठी लागणारे पारपत्र (पासपोर्ट) आणि कागदपत्रे तिच्याकडे नसल्याने तिची रवानगी पुन्हा स्थानबद्धता केंद्रात करण्यात आली.

हेही वाचाः सगुण कदम यांना प्रवीण आर्लेकरांकडून मदतीचा हात

शिक्षा पूर्ण होऊन झाली होती सुटका

डिसेंबर २०१९ मध्ये तांझानियाच्या संशयित महिलेला स्थानबद्ध केंद्रातील पोलिसांनी येथील प्रथमश्रेणी न्यायालयात नेलं होतं. तेथे संशयित युवतीने दोघा महिला पोलीस शिपायांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली होती आणि त्यांच्या सेवेत अडथळा आणला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित युवतीविरुद्ध भा.दं.सं.च्या कलम ५०४, ३५३ व विदेशी कायदा कलम १४ नुसार गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यांखाली संशयित युवतीला प्रथमश्रेणी न्यायालयाने २६ फेब्रुवारी २०२१ रोजी एका वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या काळात आरोपी कारागृहातच होती. त्यामुळे तिने शिक्षेचा काळ कारागृहात काढल्यामुळे तिला ७ जून रोजी कारागृहातून मुक्त करण्याचा आदेश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिला होता.

हेही वाचाः भाजपचे संघटन सचिव संतोष आज गोव्यात

त्यानुसार कारागृह प्रशासनाने २३ मे रोजी म्हापसा पोलिसांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली होती. आरोपी युवतीला कारागृहातून घेऊन जाण्यासाठी पोलीस पाठवावेत. मायदेशी पाठवण्यासाठी तिकीट आणि आवश्यक गोष्टी तिच्याकडून जमल्या नाहीत तर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करावी, अशी सूचना केली होती.

हेही वाचाः देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा किंचित वाढ

पासपोर्टअभावी पुन्हा अटक

सोमवार ७ जून रोजी म्हापसा पोलिसांनी तांझानियाची नागरिक हवा कुलवा हिला कारागृहातून पोलीस स्थानकात आणलं. मायदेशी परतण्यासाठी तिच्याजवळ पारपत्र आणि आवश्यक कागदपत्रे नाहीत. तसंच विमान तिकिटासाठी लागणारे पैसेदेखील तिच्याकडे नसल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी याबाबतची माहिती विदेशी नोंदणी विभागाला (एफएफआरओ) दिली आणि विभागाच्या परवानगीनुसार सदर युवतीची रवानगी पुन्हा स्थानबद्धता केंद्रात केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!