थकीत वेतन, बोनससाठी संजीवनीच्या कामगारांची निदर्शने

शांततापूर्ण वातावरणात चाललेल्या निदर्शनात संध्याकाळी किंचित तणाव

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी बुधवारी आपली देय रक्कम व बोनसच्या मागणीसाठी कारखान्याच्या गेटसमोर निदर्शने केली. शांततापूर्ण वातावरणात चाललेल्या निदर्शनात संध्याकाळी किंचित तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नंतर तणाव निवळला.

हेही वाचाः जीएसटी : ऑगस्टमध्ये गोव्यातून २८५ कोटी जमा

दोन महिन्यांचा पगार तसेच बोनसची द्यावा

आपला दोन महिन्यांचा पगार तसेच बोनसची द्यावा, अशी मागणी कामगारांनी कारखान्याचे प्रशासक चिंतामणी पेरणी यांच्याकडे केली होती. मागणीची पूर्तता न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तोडगा न निघाल्याने कामगारांनी बुधवारी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन सुरू केले. याची दखल घेत धारबांदोड्याचे मामलेदार कौशिक देसाई यांनी कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कामगारांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय प्रशासकांना प्रवेशद्वाराबाहेर जाऊ न देण्याचा चंग बांंधल्याने वातावरण काहीसं चिघळलं.

फोंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले

या प्रकाराची माहिती मिळताच फोंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासक पेरणी यांना कडक बंदोबस्तात कारखान्याच्या बाहेर काढले. यावेळी काही कामगारांनी प्रशासक मुद्दामहून कामगारांना छळण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी चतुर्थीपूर्वी कामगारांची देय रक्कम अदा करावी, अशी मागणी कारखान्याच्या कामगारांनी केली आहे.

हेही वाचाः सिद्धीच्या शरीरावर असलेल्या ३ मोठ्या जखमा मृत्यूपूर्वीच्या?

संजीवनीच्या काही कामगारांनी गुरुवारी प्रशासक चिंतामणी पेरणी यांना घेराव घालण्याचं ठरवलं आहे. तसं झाल्यास पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कामगारांवर अटकेची कारवाई करण्याची तयारी ठेवल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Politics | BJP | माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचं सूचक वक्तव्य

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!