डेल्टा प्लसनं गोव्याला पुन्हा दिला धोक्याचा इशारा ; सिंधुदुर्गनंतर कर्नाटकातही आढळले 2 रुग्ण !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूनं गोवेकरांना पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिलाय. शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्हयात एक रूग्ण आढळल्यानंतर आता नजीकच्या कर्नाटक राज्यातही डेल्टा प्लस विषाणूचे दोन रूग्ण आढळलेत. कर्नाटकातल्या म्हैसूर इथं दोघांना या विषाणूची लागण झाली असुन लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन कर्नाटकचे आरोग्यमंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी केलंय. त्यामुळं आता गोवा राज्याला पुर्णपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे.

कोरोना विषाणूचेच हे बदलते स्वरूप आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेला डेल्टा प्लस विषाणू जबाबदार ठरेल किंवा नाही, यासंदर्भात सरकारकडे कोणतीही माहिती नाही. या विषाणूबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे. देशात अनेक ठिकाणी असे रूग्ण सापडत आहेत. त्यामुळं केंद्र सरकारकडून येणा-या सुचनांचं आम्ही पालन करू, असंही आरोग्यमंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी सांगितलंय.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात डेल्टा प्लस विषाणूचे 40 रूग्ण आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ, पंजाब, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, जम्मू आणि आता कर्नाटक या राज्यांमध्ये हे रूग्ण आढळलेत. या विषाणूनं पहिला बळी मध्यप्रदेशात घेतलाय. डेल्टा प्लस विषाणूमुळं एका महिला रूग्णाचा मृत्यू झालाय. तीने लस घेतली नसल्याचं सांगण्यात येतंय. मात्र लस घेतलेला तीचा पती सुखरूप असल्याची माहिती मिळतेय.

गोव्यानजीकच्या सिंधुदुर्ग जिल्हयातही एक रूग्ण आढळला आहे. आता कर्नाटकातही 2 रूग्ण आढळल्यानं गोवा सरकारला विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!