गोव्यात ‘डेल्टा प्लस’ आला; रुग्ण बराही झाला!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: राज्यातील एका रुग्णाला डेल्टा प्लसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. १९ जुलै रोजी कोविडबाधित झालेला संबंधित रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. पण, पुण्यातील जीनोम सिक्वेन्सिंग लॅबकडून गेल्या आठवड्यात मिळालेल्या अहवालामुळे त्याला डेल्टा प्लसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचाः पीलीभीतमध्ये एलपीजी गॅस रिफिल करताना कारला भीषण आग
दक्षिण गोव्यातील एक रुग्ण १९ जुलै रोजी कोविड बाधित सापडला
दक्षिण गोव्यातील एक रुग्ण १९ जुलै रोजी कोविड बाधित सापडला. त्याचे नमुने तेव्हाच चाचणीसाठी पुणे येथील जीनोम सिक्वेसिंग लॅबकडे पाठवण्यात आले होते. तेथून गेल्या आठवड्यात या रुग्णाचा अहवाल आरोग्य खात्याला मिळाला होता. त्यात त्याला डेल्टा प्लसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. पण, उपचारांनंतर संबंधित रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे, अशी माहिती साथीचे रोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सोमवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
जगभरासह भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये पुन्हा कोविड सक्रीय
दरम्यान, कोविडची पहिली लाट ओसरत असतानाच जगभरासह भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यात डेल्टा, डेल्टा प्लस, कप्पा, अल्फा अशा कोविडच्या नव्या प्रकारांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत असे रुग्ण वाढण्याचा आणि या प्रकारांचा अधिक धोका असल्याचा अंदाज यापूर्वीच जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारने सुरुवातीपासूनच तिसरी लाट रोखण्यासाठी गतीने पावले उचलली होती. पण अखेर गोव्यात घातक डेल्टा प्लसने शिरकाव केल्याचे आता उघड झाले आहे.
हेही वाचाः JOB ALERT | DRDO मध्ये रिसर्च फेलोशिपची संधी; ‘एवढं’ मिळणार स्टायपेंड
डेल्टाचे आतापर्यंत २०८ रुग्ण आढळले
कोविडच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा प्लसचा एक, तर डेल्टाची लागण झालेले २०८ रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय कप्पाचे १६, अल्फाचा एक आणि अशाप्रकारचे इतर ५२ बाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली.
हेही वाचाः याच आठवड्यात गोवा विद्यापीठात कुलगुरूंची निवड शक्य
आणखी तीन कोविड बळी
राज्यात रविवार आणि सोमवारच्या चोवीस तासांत आणखी तीन कोविड बळींची नोंद झाली. नवे ५९ बाधित सापडले. तर ११८ जणांनी कोविडवर मात केली. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या ८८३ झाली आहे. एकूण मृतांची संख्या ३,१९८ झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने दैनंदिन अहवालातून दिली आहे.
हेही वाचाः उपअधिक्षक पदे थेट भरती प्रकरणः एका महिन्यात उत्तर सादर करा
दोन डोस घेतलेल्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार करोनाचे दोन्ही लस घेऊन चौदा दिवस झालेल्यांना राज्यात प्रवेश देण्याचा निर्देश सोमवारी जारी केला. त्यामुळे दोन्ही लस घेतलेल्या आंतरराज्य प्रवाशांची आता ‘कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्रा’च्या अटीतून मुक्त झाले आहेत. या निर्णयामुळे पर्यटकांसह चतुर्थीनिमित्त गोव्यात येणाऱ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. दोन्ही डोस पूर्ण केलेल्या प्रवाशांना चाचणी प्रमाणपत्रातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारने अर्जाद्वारे केली होती. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी तज्ज्ञ समितीच्या बैठकीचा अहवाल सादर करण्यात आला. याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने वरील निर्देश जारी केला आहे.