पोलिसांतील समन्वयाअभावी अट्टल चोराच्या हस्तांतरणास विलंब

गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यास कर्नाटक पोलिसांची टाळाटाळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: संशयित अट्टल चोराच्या मुसक्या आवळण्यासाठी बंगळुरूत गेलेल्या गोवा पोलीस पथकाला अंधारात ठेवून अट्टल चोर अझीझ असिफ (३१, रा. बंगळुरू-कर्नाटक) याला बंगळुरू पोलिसांनी गोव्यात आणलं. हे समजताच गोवा पोलिसांनी पर्वरी येथे बंगळुरू पोलिसांना रोखून धरले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटक पोलीस संशयिताला घेऊन माघारी फिरले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत बंगळुरू पोलिसांनी संशयिताला गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले नव्हते.

संशयित अझीझ असिफ या अट्टल चोराचा हात असल्याचा संशय

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट, साळगाव, हणजूण परिसरात सोनसाखळ्या हिसकावणे, मोबाईल फोन खेचून नेण्याचे प्रकार घडले होते. यात संशयित अझीझ असिफ या अट्टल चोराचा हात असल्याचा संशय गोवा पोलिसांनी व्यक्त केला होता. भाड्याच्या दुचाकीवरून चोरी करताना तो एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला होता. कळंगुट पोलिसांत सोनसाखळी हिसकावल्याचा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल आहे. संशयित अझीझ बंगळुरूला पसार झाल्याची माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे गोवा पोलीस पथक गुरुवार, दि. १६ रोजी बंगळुरूला रवाना झाले होते.

संशयिताचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला

संशयिताचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला. गोवा पोलीस आल्याची कल्पना येताच संशयित लपून बसला होता. गोवा पोलिसांनी नियमानुसार बंगळुरूतील स्थानिक पोलीसांना संशयिताची माहिती दिली. शनिवार, १८ रोजी रात्री स्थानिक पोलिसांनी संशयित अझीझ असिफ याला पकडले. गोवा पोलीस पथकाला कल्पना न देताच ते त्याला घेऊन रविवारी सकाळी गोव्यात दाखल झाले. संशयिताच्या मांद्रे येथील खोलीची बंगळुरू पोलिसांनी झाडाझडती घेतली.

गोवा पोलीसांनी वरिष्ठांच्या कानावर गोष्ट घातली

हा प्रकार समजताच गोवा पोलीसांनी वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली. रविवारी दुपारी संशयिताला माघारी घेऊन जाण्याच्या तयारीत असताना बंगळुरू पोलिसांना कळंगुट पोलिसांनी पर्वरी येथे सुमारे दीड तास रोखून धरले. नंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कर्नाटक वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला. संशयिताला गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या अटीवर बंगळुरू पोलिसांना माघारी जाण्याची मुभा दिली.

रात्री उशिरापर्यंत संशयित अझीझ असिफ गोवा पोलिसांच्या स्वाधीन

या दरम्यान, बंगळुरूला गेलेले गोवा पोलीस पथक गोव्याकडे रवाना झाले होते. त्यांना पुन्हा माघारी बंगळुरूकडे पाठविण्यात आले. संशयिताला घेऊन बंगळुरूतील बनासवाडी पोलीस सोमवारी सकाळी बंगळुरूला पोहोचले. रात्री उशिरापर्यंत संशयित अझीझ असिफ याला गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले नव्हते. गुन्हेगाराला आसरा देणार्‍या या प्रकाराबद्दल गोवा पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संशयित अझीझ असिफ याला यापूर्वी गोवा पोलिसांनी अटक केली होती, त्यावेळीही बंगळुरू पोलिसांनी संशयिताने चोरलेला माल गोवा पोलिसांकडे दिला नव्हता, अशी माहितीही समोर आली आहे.

चोरीचा माल लाटण्यासाठीच बंगळुरू पोलीस गोव्यात?

संशयित अझीझ याने सुमारे ८ ते १० लाखांचा मुद्देमाल चोरला होता; पण त्याच्या मांद्रे येथील खोलीत पोलिसांना काहीच मिळाले नाही. एवढ्या मोठ्या रकमेचा माल आपल्या हाती लागेल आणि तो हडप करता येईल, या आमिषापोटीच गोवा पोलीस पथकाला फसवून बंगळुरू पोलीस संशयिताला घेऊन गोव्यात दाखल झाले होते, असा संशय गोवा पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!