स्वाती कुमारी मिश्राला नक्की ऐका…

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरोः राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात पहिल्यांदाच गोव्याला प्रतिनिधीत्व मिळालं. गोव्यातून स्वाती मिश्रा हीने या महोत्सवात भाग घेतला. नवी दिल्लीतील सेंट्र्ल हॉलमध्ये समस्त राज्यांचे प्रतिनिधी, महनीय ज्यूरी आणि लोकसभेचे सभापती आणि इतर प्रतिष्ठीत पाहुण्यांसमोर या युवा प्रतिनिधींना भाषण करण्याची संधी प्राप्त झाली. ‘वोकल फॉर लोकल’ हा विषय घेऊन स्वाती मैदानात उतरली. विशेष म्हणजे आपण लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षणाचं बोलतो. इथे तर युवा संसद महोत्सवात युवतींनीच बाजी मारली. भविष्यात महिलांना आरक्षणाच्या कुबड्यांचीही गरज लागणार नाही. या महिला स्वतःच्या हिंमतीवर प्रतिनिधीत्व प्राप्त करतील,असं चित्रच या महोत्सवात पाहायला मिळालं.
कोण आहे स्वाती मिश्रा?
फोंडा तालुक्यातील खांडेपार इथे राहणारी स्वाती मिश्रा मडगावातील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाची द्वितीय वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थिनी. राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करायचं म्हटल्यावर हिंदी किंवा इंग्रजी भाषेवर प्रभूत्व ही प्राथमिक गरज लागते. साहजिकच स्वाती मिश्रा हीचा जन्म आणि शिक्षण गोव्यात झालंय. तिचे वडिल मायनिंग इंजिनियर आहेत. हे मिश्रा कुटुंब गोंयकार बनलंय. पण स्वातीची मातृभाषा हिंदी असल्याने तिने गोव्यातून निवड होण्यात बाजी मारली. आता तिची मातृभाषा हिंदी असली तरीही स्वाती ही गोंयकार असल्यामुळे ती अस्खलीत आणि अस्सल कोकणी बोलू शकते. पण तरीही आपल्या राष्ट्रीय भाषा हिंदीकडे आपलं होणारं दुर्लक्ष आणि त्यात प्रादेशिक भाषा विरूद्ध इंग्रजी असं सुरू असलेलं द्वंद्व यात आपल्या तरुणाईचं आणि एकूणच भावी पिढीचं मोठं नुकसान होत असल्याचं या स्पर्धेच्या निमित्तानं कळून चुकलं.
युवा संसद महोत्सवात गोव्याचं प्रतिनिधीत्व करणारी पहिलीच
या महोत्सवात वेगवेगळ्या राज्यांचे युवा प्रतिनिधी भाषण देत होते. अगदी ज्यांची गणती आपण मागासलेली राज्ये म्हणून करतो त्यांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने याठिकाणी बोलत होते किंवा व्यक्त होत होते, ते पाहीलं तर आपली प्रगती आणि त्यांचा मागासलेपणा हा एकाच पातळीवरचा असावा,असं सहजिकच वाटून गेलं. स्वाती मिश्रा पहिल्यांदाच गोव्याचं प्रतिनिधीत्व युवा संसद महोत्सवात करतेय ही प्रत्येक गोंयकारांसाठी अभिमानाची गोष्ट ठरावी, म्हणूनच गोवन वार्ता लाईव्हने आपल्या फेसबुक लाईव्हवर दिल्लीतील हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला. गोवन वार्ता वृत्तपत्र आणि गोवन वार्ता लाईव्ह महाचॅनल वगळता अन्य कुणीही या स्पर्धेला किंवा स्वाती मिश्रा आणि अन्य दोन प्रेम कुमार आणि प्रियांका कदम यांच्या निवडीला मोठे महत्व दिलं नाही. गोव्याच्या युवा नेतृत्वाला, युवा कला गुणांना आणि युवा आविष्काराला प्रोत्साहन आणि बळकटी देणं हे आपलं ब्रिद आहे आणि त्यामुळेच आम्ही या घटनेला आमच्या प्राधान्यक्रमात जागा दिली. भविष्यात या स्पर्धेकडे गंभीरतेने पाहावं लागेल. नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाकडून ही स्पर्धा भरवली जाते. जिल्हा प्रतिनिधी आणि राज्य प्रतिनिधी या स्तरावर ही स्पर्धा होते. राज्य प्रतिनिधीतून अव्वल ठरणारा स्पर्धक राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधीत्व करतो.
स्पर्धेत सहभागी होण्याचं धाडस उल्लेखनीय
केवळ वक्तृत्व चांगलं असलं म्हणून होत नाही. आजची युवा पिढी सामाजिक घटना, विचार प्रवाह, राजकीय घटमाक्रम यापासून दूरावत चाललीय. ही पिढी आपल्याच जगात वावरतेयं. साहजिकच देशात काय चाललंय किंवा देशाची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे याचं भान या युवा पिढीला राहीलेलं नाही,असंच अनेकांच मत बनलंय. हे नेमकं असं का घडतंय. विविध राजकीय पक्षांचे युवा विभाग आहेत. त्यातूनही युवा नेतृत्व घडताना दिसत नाहीये. केवळ पाठीराखे आणि अनुयायी म्हणूनच या युवकांकडे पाहिलं जातंय. हेच कारणं असावं की कुठल्याही विषयावर बोलण्यासाठी त्या विषयाची माहिती किंवा त्याविषयाबाबत विचार मनात असणं गरजेचं आहे. केवळ भाषण लिहून ते पाठ करणं आणि पाठांतराच्या बळावर बोलणं वेगळं आणि विचारांतून प्रकट होणं वेगळं. काही ठरावीक अपवाद वगळल्यास अधिकतर प्रतिनिधी हे पाठांतर करूनच तिथे आले होते आणि पाठांतराचं विस्मरण झाल्यानं अनेकांच्या भाषणात खंड पडत असल्याचंही चित्रं पाहायला मिळालं. स्वातीच्या बाबतीत तेच घडलं. पण म्हणून त्यांचा निरूत्साह किंवा त्यांना कमी लेखण्याची काहीही गरज नाही. त्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं धाडस दाखवलं आणि नवी दिल्लीतील त्या सेंट्रल हॉलच्या पोडीयमसमोर उभं राहून बोलण्याचं धारिष्ठ करणं हेच उल्लेखनीय आणि स्वागतार्ह असंच धाडस म्हणावं लागेल.
पंतप्रधानाचं ट्वीट…
राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक राज्य प्रतिनिधींचं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटव्दारे केलंय. आपल्या स्वाती मिश्रा हीचाही त्यात सहभाग आहे. पंतप्रधान ट्विटमध्ये म्हणालेत, राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात स्वाती कुमारी मिश्रा हिने उत्कृष्टरित्या गोव्याचं प्रतिनिधित्व केलं. ‘व्होकल फॉर लोकल’ आपण का निवडावं, याबद्दल तिचं भाषण नक्की ऐका.
Swati Kumari Mishra represented magnificent Goa during the National Youth Parliament Festival. Do hear her speak about why we must go 'vocal for local'. https://t.co/ejcFEgrQ5Q
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2021
आव्हान स्विकारणं महत्त्वाचं
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव ही स्पर्धा दरवर्षी होते. या स्पर्धेसाठी प्रतिनिधी तयार करण्याची यंत्रणा प्रत्येक राज्य सरकारने तयार करायला हवी. नेहरू युवा केंद्र आणि विधानसभा किंवा विधीमंडळ फोरम यांच्या मदतीने राज्यभरातून काही निवडक प्रतिनिधी निवडून त्यांच्याकडून तयारी करून घ्यावी लागेल. वेगवेगळ्या विषयांची माहिती, वक्तृत्व कला, भाषेवरील पकड आणि स्पर्धेसाठी इतर आवश्यक गोष्टींचा सराव करूनच राज्यांनी या स्पर्धेत आपल्या प्रतिनिधींना उतरवलं तर ते अधिक प्रभावी ठरू शकेल. ही जबाबदारी प्रत्येक महाविद्यालयांकडे देता येईल. प्रत्येक महाविद्यालयाने आपला किमान एक प्रतिनिधीत्व जिल्हा स्तरावरील स्पर्धेत पाठवणं सक्तीचं करायला हवं. तरंच या स्पर्धेला महत्व प्राप्त होईल आणि त्यातून खऱ्या अर्थाने युवा नेतृत्वाचं नवं अंकुर फुटू शकेल. गोव्याच्या स्वाती मिश्राने ही सुरुवात करून दिलीये. आता यापुढे प्रत्येक युवकाने युवा संसद महोत्सवातील प्रतिनिधीत्व स्विकारण्याचं आव्हान स्विकारायला हवं. आपल्या गोव्याचं वेगळेपण, आपल्या गोव्याची संस्कृती, आपल्या गोव्याचं गोंयकारपण या युवा नेतृत्वाच्या भाषणातून प्रतिबिबिंत झालं तरच आपण आपलं गोंयकारपणं राखू शकू.