सिंधुदुर्ग-गोवा प्रवेशाबाबत 2 दिवसांत निर्णय

आमदार रवींद्र चव्हाण, राजन तेली यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं आश्वासन

विनायक गांवस | प्रतिनिधी

सावंतवाडी : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन गोवा हायकोर्टाकडून परराज्यातील लोकांना गोव्यामध्ये प्रवेशासाठी बंदी आणण्यात आली होती. मात्र, गोवा सरकारनं याबाबत पुनर्विचार याचिका सादर केली असून पर्यटनावर याचा परिणाम होत असल्याचे म्हणणे मांडले आहे. याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार असून सिंधुदुर्गातून गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे आश्वासन माजी राज्यमंत्री आ. रवींद्र चव्हाण तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची आ. रविंद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा केली. दोडामार्ग तालुक्यातून गोव्यामध्ये जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या डागडूजीबाबतही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावरही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत, याबाबतही त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा आजही आरोग्याच्या दृष्टीने गोवा राज्यावर अवलंबून आहे. या ठिकाणचे बरेच रुग्ण गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आजही उपचारासाठी धाव घेतात. मात्र, त्या ठिकाणी गेल्यानंतर जिल्ह्यातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हावासियांची ही अडचण लक्षात घेता त्या ठिकाणी स्वतंत्र टेबल व्यवस्था असावी, अशी मागणी आ. रवींद्र चव्हाण व राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याजवळ केली असता त्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहितीही यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!