बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर आजच निकाल येणार?

अंतिम सुनावणीसोबत निर्णयही आजच होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी आज येण्याची शक्यता आहे. कारण आज सभापती राजेश पाटणेकर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर अंतिम सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीनंतर निकाल येण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे आजच अपात्रतेचा निकाल लागणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे.

काँग्रेस आणि मगोतून भाजपात गेलेल्या आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सभापती राजेश पाटणेकर आजअंतिम सुनावणी घेणार असल्याचं निश्चित झालं होतं. त्यासाठी काँग्रेस आणि मगोच्या नेत्यांना त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी बोलावल्याचंही खात्रीलायक वृत्त शनिवारीच हाती आलेलं. महत्त्वाचं म्हणजे आजच दिवशी बंडखोर आमदारांच्या पात्र-अपात्रतेवर निर्णय होतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत गोवा फॉरवर्ड आणि मगोची साथ घेऊन भाजपने राज्यात आघाडी सरकार स्थापन केलं. पण त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांनंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या दहा आणि मगोच्या दोन आमदारांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने गोवा फॉरवर्ड आणि मगोला सरकारातून बाहेर काढलं. फुटीर आमदारांनी आपापले पक्षच भाजपात विलीन केल्याचा दावा केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि मगोचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी फुटीर आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील याचिका सभापतींकडे दाखल केली. पण बराच काळ सभापतींनी त्यावर सुनावण्या न घेतल्याने चोडणकर आणि ढवळीकर सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

आज पालिकांचाही निकाल

आजच पालिका निवडणुकांचाही निकाल लागणार आहे. त्यासाठी आज मतदान सुरु आहे. त्यामुळे पालिकांचा निकाल आणि अपात्रतेचा निकाल, एकाच दिवशी लागतो का, याची उत्सुकता राज्यातील जनतेला आता लागली आहे.

हेही वाचा – पालिका निवडणुकांचे लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!