अधिवेशनापूर्वी युतीचा निर्णय घ्या; अन्यथा धोरण बदलणार

गोवा फॉरवर्डचा काँग्रेसला अल्टिमेटम

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी: विधानसभेच्या येत्या अधिवेशनापर्यंत काँग्रेसने युतीसंदर्भात निर्णय न घेतल्यास गोवा फॉरवर्डला आपलं पुढील धोरण बदलावं लागेल. विधानसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याने युतीबाबत लवकर निर्णय होणे गरजेचे आहे. वेळ झाल्यास युतीचा काहीही फायदा होणार नाही, असं गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी बुधवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केलं.

हेही वाचाः खताच्या दुकानाला लागली आग

‘टीम गोवा’ म्हणून संघटितपणे लढणं आवश्यक

राज्यातील भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन मोट बांधणं आणि येत्या विधानसभा निवडणुकीत ‘टीम गोवा’ म्हणून संघटितपणे लढणं आवश्यक आहे. ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊन आगामी विधानसभा निवडणूक जिंकणं कोणत्याही पक्षाला शक्य नाही. अगदी २०१२ मध्ये माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची लोकप्रियता शिखरावर असताना पर्रीकरांनाही ‘एकला चलो रे’चा नारा देत निवडणूक लढणं शक्य झालं नव्हतं. याचा सारासार विचार करून काँग्रेसने आपलं युतीबाबतचं धोरण लवकरात लवकर जाहीर करणं आवश्यक आहे. विधानसभेचं अधिवेशन २८ जुलैपासून सुरू होत आहे. त्याआधी काँग्रेसने आपलं धोरण जाहीर केल्यास आम्हाला अधिवेशनात संघटितरीत्या सरकारला विरोध करणं शक्य होईल. पण, काँग्रेसने तोपर्यंत भूमिकाच स्पष्ट न केल्यास अधिवेशनातही आम्हाला आमची भूमिका बदलावी लागेल, असं सरदेसाई म्हणाले.

हेही वाचाः गांजे ते उसगाव रस्त्यावर ट्रक फसला

तर ‘भाजपमुक्त गोवा’ साकार होण्यास वेळ लागणार नाही

‘टीम गोवा’चा प्रयोग करून निवडणूक जिंकता येते हे आम्ही मडगाव पालिका निवडणुकीतून दाखवून दिलं आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही हाच प्रयोग राबवल्यास ‘भाजपमुक्त गोवा’ साकार होण्यास वेळ लागणार नाही. पण त्यासाठी काँग्रेसला प्रथम आपली भूमिका स्पष्ट करावी​ लागेल. त्यानंतरच ‘टीम गोवा’मध्ये कोणाकोणाचा सहभाग असेल याबाबत पुढील विचार करता येईल, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः तिसरी लाट आली तरी, तोंड द्यायला सरकार सक्षम!

विरोधकांनी एकजूट ठेवणं आवश्यक

भाजपमुक्त गोव्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं असल्याचं लक्षात घेऊन आम्ही विधानसभेतही संघटित होत आहोत. विविध प्रश्नांवरून संघटितरीत्या सरकारला घेरत आहोत. हीच एकी पुढे कायम राहिल्यास भाजपला निवडणूक जिंकणं कठीण होणार आहे, याचा गांभीर्याने विचार करून विरोधकांनी एकजूट ठेवणं आवश्यक आहे, असंही विजय सरदेसाई यांनी नमूद केलं.

हेही वाचाः म्हापसा अर्बनः पहिल्या टप्प्यातील लिक्विडेशनची प्रक्रिया पूर्ण

काँग्रेसकडून मात्र अद्याप युतीसंदर्भात शब्दही नाही

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड-काँग्रेसची युती होण्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांतही अंतर्गत चर्चा सुरू आहे. विजय सरदेसाई यांनी दिनेश राव यांच्याशीही याबाबत चर्चा केली. पण काँग्रेसकडून मात्र अद्याप युतीसंदर्भात शब्दही काढला जात नाही. युतीचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील, असं म्हणत राज्यातील नेते प्रत्येकवेळी यासंदर्भात बोलणे टाळत आहेत. जोपर्यंत काँग्रेस आपली भू​मिका स्पष्ट करणार नाही, तोपर्यंत आम्हाला पुढे जाणे शक्य नसल्याचं विजय सरदेसाईंनी स्पष्ट केल्यामुळे काँग्रेस काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचाः म्हापशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

काँग्रेस प्रदेशाध्यक्षाबाबत सरदेसाईंची भूमिका

– गिरीश चोडणकर यांनाच कायम ठेवायचं की अन्य कोणाला प्रदेशाध्यक्ष करायचं हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. त्यासंदर्भात आपण काहीही बोलू शकत नाही. पण, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी समविचारी नेत्याची निवड झाल्यास त्याचा युती, काँग्रेस आणि गोव्यालाही निश्चित फायदा होईल.
– मडगाव पा​लिका निवडणूक आम्ही ‘टीम गोवा’ म्हणून जिंकली. पण या निवडणुकीत चोडणकर यांची भूमिका काय होती हे काँग्रेसला माहीत आहे. युती नकोच अशी भूमिका असलेला प्रदेशाध्यक्ष असल्यास युतीची चर्चा पुढे जाणं अशक्य आहे.
– गोवा फॉरवर्डचे अस्तित्व युतीवरच अवलंबून आहे असं नाही. याआधीही आम्ही स्वबळावर निवडणुका लढून आणि भाजप, काँग्रेसचा पराभव करून त्या जिंकलेल्याही आहेत. तशीच वेळ विधानसभा निवडणुकीतही आल्यास स्वबळावर लढून जिंकण्याची ताकद आमच्याकडे आहे.

हेही वाचाः काणकोणात अजून एक सोनसोडा होणार का?

काँग्रेस प्रभारी दिनेश राव यांच्याशी चर्चा

विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-गोवा फॉरवर्डच्या युतीसंदर्भात मी काँग्रेस प्रभारी दिनेश राव यांच्याशी चर्चा केली आहे. सद्यस्थितीत गोव्यात युतीची का गरज आहे, हेसुद्धा त्यांना सांगितले आहे. शिवाय प्रदेशाध्यक्षपदाबाबतची माझी भूमिकाही स्पष्ट केली आहे, असं
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!