दोघांचा मृत्यू, दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

सासष्टीतील जमीन घोटाळा प्रकरण : फातोर्डा पोलिसांकडून संशयितांना नोटिसा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी फातोर्डा पोलिसांत, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री प्रकरणी नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यानंतर दोन संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून अन्य दोन संशयितांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय एक संशयित पोलीस ठाण्यात हजर झाला. मात्र, सहाजण नोटीस प्राप्त झाल्यानंतरही चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हेही वाचाः हे सरकार कुणाचं, आज सिद्ध होईलः मनोज परब

मूळ मालकाला अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे सासष्टीतही जमिनींच्या खरेदी-विक्रीचे प्रकार झाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. ज्या जमिनींच्या मूळ मालकांचा मृत्यू झालेला असेल किंवा जमीनमालक विदेशात स्थायिक झालेला असेल, जमिनीच्या देखभालीसाठी कोणीही नसेल, अशा जमिनी हडप करण्याचे किंवा त्यांची विक्री करण्याचे प्रकार घडलेले आहेत. यासंदर्भात सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी १५ जून २०२१ रोजी फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचाः रिकार्डो भाजपात जाणार की एनसीपीत?

१३ जमिनींच्या विक्रीचा व्यवहार हा बनावट कागदपत्रांद्वारे झाला असून, मामलेदार कार्यालयातील केवळ त्याच व्यवहाराच्या फाईल्स गहाळ झालेल्या आहेत, असे या तक्रारीत गावकर यांनी नमूद केले आहे. जमिनींचे व्यवहार बनावट कागदपत्राद्वारे झाल्याचे लक्षात आल्यानंतर सासष्टीतील उपनिबंधक कार्यालयाला ३० ऑक्टोबर २०२० व १३ नोव्हेंबर २०२० रोजी पत्र लिहून संबंधित जमिनींची माहिती मागवण्यात आली होती. १० नोव्हेंबर २०२० व ७ डिसेंबर २०२० रोजी मडगाव उपनिबंधक कार्यालयाकडून जमिनी व्यवहाराबाबतच्या कागदपत्रांच्या प्रती पाठवण्यात आल्या होत्या. या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर उपनिबंधक कार्यालयातील व त्या जमिनींच्या झालेल्या व्यवहारातील कागदपत्रांचा कोणताही मेळ बसत नव्हता. यानंतर काही म्युटेशन रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र, मामलेदार कार्यालयातील रेकॉर्ड रूममधून संबंधित घोटाळा झालेल्या फाईल्स गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जमीन विक्रीसाठी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या अर्जदारांविरोधात मामलेदार गावकर यांनी तक्रार नोंदवली.

हेही वाचाः ACCIDENT | गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू

केवळ एकच संशयित चौकशीसाठी हजर

बनावट कागदपत्रांद्वारे जमिनींची खरेदी विक्री केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी १७ संशयितांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर संशयितांपैकी फ्रान्सिस्को कुलासो, रेजिनो फालेरो यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आलेक्स फालेरो व जॉन फालेरो यांचा मृत्यू झालेला आहे. महादेव चव्हाण यांनी पोलिसांसमोर हजेरी लावली. पण रुबी फर्नांडिस, पावलिनो फालेरो, एना मारिओ फालेरो, सॅबेस्त्याव परेरा, मारिओ जुवांव फालेरो, अँजेलो मोंतेरो हे संशयित नोटीस प्राप्त झाल्यानंतरही उपस्थित राहिले नाहीत.

हेही वाचाः मडगाव अर्बन को ऑप. बँकेचा परवाना रद्द

फातोर्डा पोलिसांकडून गुन्हा नोंद

बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, फसवणुकीच्या एका समान हेतूने अनेकांनी कार्य करणे यासाठी फातोर्डा पोलिसांकडून कलम ४६५, ४६८, ४७१, ४२० यांसह भा.दं.सं. ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याप्रकरणी फ्रान्सिस्को कुलासो (दवर्ली), रुबी फर्नांडिस (दवर्ली), आलेक्स फालेरो, जॉन फालेरो, रिजेनो फालेरो, पावलिनो फालेरो, मारिओ फालेरो, अँजेला मोंतेरो फालेरो, डायगो फर्नांडिस, पिएदाद डिसोझा (सर्व सां जुझे द अरियाल), एना मारिओ परेरा, सॅबेस्त्याव परेरा (दोघे रा. बोर्डा, मडगाव), मार्टिस कुतिन्हो (कुंकळ्ळी), जुवांव आलेक्स रोझारिओ लुईस (कोलवा), वालेरियन थॉमस (कोलवा), एना वाझ (कोलवा), महादेव चव्हाण (डोंगरी नावेली) या संशयितांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचाः ACCIDENT | साकवाळ येथील अपघातात एकाचा मृत्यू

मामलेदार कार्यालयातून फाईल्स गायब

सासष्टी तालुक्यातील जमिनींच्या विक्रीचे व्यवहार बनावट कागदपत्रांचा वापर करून झालेला आहे. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांसमोरील सुनावणीत उघडकीस आली. त्यानंतर मामलेदार कार्यालयातील रेकॉर्ड रुममधील संबंधित जमीन व्यवहारांच्या म्युटेशनसंदर्भातील १३ फाईल्स गायब झाल्या. या फाईल्स वेगवेगळ्या मामलेदारांच्या कालावधीतील आहेत. त्यामुळे या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मामलेदारांनी तक्रार नोंदवली व पोलिसांनी मामलेदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती घेतलेली आहे.

हेही वाचाः काय चाललंय काय? केपेत आसाममधील तरुणीवर बलात्कारानं खळबळ

मामलेदार प्रतापराव गावकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीचे व्यवहार झाल्याच्या केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद केलेला आहे. संशयितांना नोटीस पाठवण्यात आलेली असून सर्व बाजूंनी या जमीन व्यवहारांबाबतचा तपास केला जात आहे, असं फातोर्डाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | Chodankar vs Sardesai | निवडणुका जवळ आल्या, काय असेल राजकीय समीकरण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!