‘दीनदयाळ’मुळे खासगी हॉस्पिटलांत संभ्रम!

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी
पणजी : राज्य सरकारने करोना उपचारांचा समावेश दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेत करून बाधितांना दिलासा मिळवून दिला. पण अगोदर निश्चित केलेल्या खासगी इस्पितळांतील दरांबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे खासगी इस्पितळांत संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यात गंभीर करोनाबाधितावर दीनदयाळच्या रकमेत दर्जेदार उपचार होऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारने या रकमेचा फेरविचार करावा, अशी मागणी खासगी इस्पितळांकडून होऊ लागली आहे.
मध्यम आणि गंभीर स्थितीतील करोनाबाधितांना १४ दिवसांसाठी ६४,४०० ते ९२,४०० रुपयांपर्यंतचे उपचार दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेअंतर्गत देण्याचा निर्णय सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतला. दोन्ही स्थितीतील रुग्णांवर हा खर्च कशा पद्धतीने होणार, याचा समावेश असलेली अधिसूचनाही आरोग्य खात्याने नुकतीच जारी केली आहे. पण इतक्या कमी खर्चात करोनाबाधितांवर दर्जेदार उपचार होऊ शकत नाहीत. इतक्या खर्चात उपचार होऊ शकतात का, गेल्या काही दिवसांत खासगी इस्पितळांत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांना किती खर्च आला, याचा अभ्यास करून सरकारने रुग्ण आणि इस्पितळांना परवडेल अशा पद्धतीने रक्कम निश्चित करणे गरजेचे होते, असे स्पष्ट मत मणिपाल इस्पितळाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले.
सरकारने आदेश दिल्यानंतर आम्हाला सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना घरी पाठवावे लागेल. नवे कर्मचारी घ्यावे लागतील. डॉक्टर, परिचारिकांची पूर्ण व्यवस्था करावी लागेल. मणिपालमध्ये कर्करोगाच्या रुग्णांवर विविध थेरपी सुरू असतात. त्यांचा विचार करावा लागेल. या सर्व गोष्टींची व्यवस्था झाल्यानंतरच करोनाबाधितांवर उपचार सुरू करावे लागतील. ही सर्व व्यवस्था तत्काळ होणे अशक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खासगी इस्पितळांना करोनावरील उपचारांसाठी सर्वसामान्य वॉर्डसाठी प्रति दिन १२ हजार, ट्विन शेअरिंगसाठी १५ हजार, स्वतंत्र खोलीसाठी १८ हजार तसेच आयसीयू आणि व्हेंटिलेटरसाठी २५ हजार याव्यतिरिक्त औषधे, सर्जरी, विशेष डॉक्टर व अतिरिक्त ऑक्सिजनसाठी वेगळा खर्च असे १४ दिवसांसाठी सुमारे ३ ते ५ लाखांपर्यंतचे दर निश्चित केले होते. यावरून टीका झाल्यानंतर या दरांत एक-दोन हजारांची सूट देण्यात आली होती. आता हे सर्वच उपचार दीनदयाळअंतर्गत आणून १४ दिवसांसाठी ६४,४०० ते ९२,४०० रुपयांपर्यंत करण्याचे ठरविण्यात आले आहे.
डॉ. शेखर साळकर म्हणतात…
1 गोमेकॉमधील कोविड इस्पितळात सध्या अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील जे रुग्ण गंभीर स्थितीत गेले आहेत. त्यांना शेवटच्या क्षणी खासगी इस्पितळांत पाठविण्यात येईल.
2 त्यांचा जीव वाचविण्यासाठी अत्याधुनिक आणि दर्जेदार उपचार करावे लागतील. पण त्या रुग्णांचे नातेवाईक दीनदयाळमधील खर्चातच उपचार करा, अशी मागणी करतील. त्यावेळी खासगी इस्पितळांसमोर अनेक प्रश्न निर्माण होतील.
3 गंभीर बाधितांवरील उपचारांत तडजोड झाल्यास त्यांचा जीव वाचवणे कठीण होऊन जाईल. पण सरकार म्हणत असेल तर आम्हाला ते करावेच लागेल.
यंदा १९ हजार जणांच्या कार्डांचे नूतनीकरण नाही : पै
दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेची नूतनीकरण प्रक्रिया ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. राज्यात २.२४ लाख नागरिक योजनेचे लाभार्थी आहेत. त्यातील २.५ लाख जणांच्या कार्डांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यावर्षी १९ हजार जणांच्या कार्डांचे नूतनीकरण झालेले नाही, अशी माहिती योजनेचे सल्लागार डॉ. बाळकृष्ण पै यांनी दिली. योजनेसाठी पात्र नसतानाही अनेक सरकारी कर्मचारी योजनेचा लाभ घेत होते. अशा अनेकांच्या कार्डांचे यावेळी नूतनीकरण करण्यात आले नाही. याशिवाय सुमारे तीन हजार जणांनी स्वत:हून नूतनीकरण केलेले नाही, असे डॉ. पै यांनी सांगितले.