दयानंद सोपटेंना धमकी, तिघांना अटक-सुटका

संशयितांच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं नाराजी

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांना शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय. चनईवाडा-हरमल इथल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी सोपटे गेले असता हा प्रकार घडला.

शुक्रवारी 9 एप्रिलला हा प्रकार घडला. चनईवाडा इथल्या एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आमदार सोपटे गेले असता त्या जमिनीच्या मालकांनी त्यांना धमकावल्याचा आरोप आहे. संजय नाईक, मीनाक्षी तळवणेकर आणि महेश तळवणेकर अशी त्यांची नावं आहेत. या निघांनी शिविगाळ केली आणि आमदार सोपटे यांना ठार मारण्याची धमकी दिली. या विषयी आमदार सोपटे यांनी पेडणे पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पेडणे पोलिसांनी विलंब न लावता त्याच दिवशी या तिघाही संशयितांना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

दरम्यान, संशयितांनीही आमदार सोपटे, पंच अनंत गडेकर आणि डॅनियल डिसोझा यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीला तीन दिवस झाले, तरी पोलिसांनी त्या तक्रारीची काहीच दखल न घेतल्यामुळे तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केलीय. पेडणे पोलिसांचा व्हीआयपी लोकांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा न्याय असं का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. आमदार सोपटे यांनीच आम्हाला अपशब्द वापरून अपमानित केलं, धमकी दिली आणि आमच्या जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार हरमल इथल्या संजय हरी नाईक, त्याची बहीण मीनाक्षी तळवणेकर आणि महेश तळवणेकर यांनी पेडणे पोलिसांत दिली होती.

आमदार सोपटे यांना धमकी आणि सार्वजनिक कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांना अटक केली. मात्र, सोपटेंविरुद्ध संशयितांनी जी तक्रार दिली, त्याची पोलिसांनी आजपर्यंत कोणतीच दखल घेतली नसल्यानं तक्रारदार नाराज आहेत. हे प्रकरण जनतेच्या दरबारी नेण्याचा निर्धार त्यांनी केला असून पोलिसांच्या भूमिकेविषयी सर्वसामान्य नागरिक संशय व्यक्त करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!