दामोदर बनला न्हावी…

लॉकडाऊनच्या काळात लोकांना मोफत कापले केस

Goan Varta Live | प्रतिनिधी

केरी-सत्तरी:  लॉकडाऊनच्या काळात सलून बंद असल्याने डोक्यावर वाढलेल्या केसांचं काय करावं असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. काहींनी आपल्या घरातच केस कापले, तर बऱ्याच जणांना ते घरात कापता आले नाहीत. त्यामुळे डोक्यावर जणू जंगल झालं. सुमारे दोन -तीन महिन्यांच्या कालावधीत वाढलेल्या केसांमुळे पुरुषांचा अवतारच झाला. काहींना हे केस डोक्यावरचं ओझं वाटू लागले. सलून बंद असल्याने वरचे-हरवळे साखळी येथील युवक दामोदर विनायक मळीक याने आपल्या अंगणात एक स्टूल ठेवून, बाजूला पडदा बांधून गावातील लोकांचे मोफत केस कापले, दाढी केली. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन आणि या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये त्याने शेकडो लोकांना मोफत केस कापून दिले आणि दाढी करून दिली. आणि अजूनही तो करत आहे.

सामान्य कुुटुंबाती दामोदर

दामोदर हा एका सामान्य  कुटुंबातील मुलगा. सध्या तो सेक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. आपल्या फावल्या वेळेत तो ही सेवा देत आहे. ज्यांची दाढी करायची आहे, केस कापायचे आहेत, त्यांनी येताना फक्त एक ब्लेड घेऊन यावं आणि दाढी करून घ्यावी, केस कापून घ्यावे, असं त्याचं म्हणणं. दाढी करायला किंवा केस कापायला मी पैसे घेणार नाही. जर मी पैसे घेतले तर तो एक व्यवसाय होईल. मला व्यवसाय करायचा नाही. मला सेवा द्यायची आहे असं तो सांगतो.

सुट्टीच्या दिवशी आनंदाने करतो काम

गावातील लोकांनी दामोदरकडून वेगवेगळ्या हेअरस्टाईल्सही करून घेतल्या, तर काहींनी साध्या कटवरच समाधान मानलं. जाणत्या, वयस्क व्यक्तींना खूपच फायदा झाला. सध्या अनेकजण दामोदरकडे येत आहेत. जेव्हा त्याला सुट्टी असते, तो हे काम आनंदाने करतो. आपल्या गावातच नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या मित्रपरिवाराचेही तो मोफत केस कापून देतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!