Be Positive | Home Isolationमध्ये नव्यानं भर पडलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त!

मात्र राज्यात मृत्यूदराची चिंता अजूनही कायम!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी ५० जणांचा मृत्यू झाल्यामुळे चिंता कायम असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील आता एकूण बळींचा आकडा हा १ हजार ७२९ वर जाऊन पोहोचला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या मृतांच्या संख्येमुळे राज्यातील मृत्यूदराची डोकेदुखी वाढवली आहे.

सोमवारी राज्यात २ हजार ८०४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यातील २ हजार ३२७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर ३०९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसरीकडे १६५ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले असून त्यांना आता हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आल्याची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे जारी करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांत राज्याचा रिकव्हरी रेट २ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या दोन दिवसांतल्या कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आता राज्याचा रिकव्हरी रेट हा ७२.०६ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत एकूण २ हजार ३६७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये वाढ होत असली तरीही सक्रिय रुग्णसंख्या ही चिंतेचा विषय ठरतेय. राज्यात सध्याच्या घडीला ३२ हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे. असं असलं, तरीही राज्यातील रुग्णालयेही कोरोना रुग्णांनी तुडुंब भरल्याचंच चित्र पाहायला मिळतंय.

सोमवारी कुठे किती मृत्यू?

सोमवारी राज्यात १५ जणांचा दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर जीएमसी तब्बल २८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय, ईएसआय, युएचसी म्हापसा, पीएचसी बेतकी या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे उत्तर गोव्यातील एका खासगी रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला असून दक्षिण गोव्यातील खासगी रुग्णालयात एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोमवारी नोंदवण्यात आलेल्या मृतांमध्ये तिघांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आल्याचंही समोर आलं आहे. त्यानंतरही कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!