ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट, गंभीर जखमी झालेल्याचा उपचारासाठी नेत असतानाचा मृत्यू

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील ऑक्सिजन सिलिंडर कंपनीत सोमवारी भरलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत उडालेल्या सिलिंडरमुळे छताचे पत्रे लागल्याने सुधीर कुमार या कामगाराला गंभीर दुखापत झाली. त्याला इस्पितळात उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कारखाने व बाष्पक खात्याचे अधिकारी मंगळवारी कंपनीची पाहणी करणार आहेत.

केव्हाची घटना?

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरला जातो. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भरलेले ऑक्सिजनचे सिलिंडर रचून ठेवण्याचे काम सुरू असताना ऑक्सिजन प्लांट या कंपनीत भरलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर उडालेला सिलिंडर छतावर जाऊन आदळला. या वेळी जवळच असलेल्या दोन कामगारांपैकी सुधीर गरीबनाल कुमार (मूळ रा. बिहार, वय २६) या कामगारावर स्फोटामुळे सिलिंडर व छतावरील पत्रे पडले. त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तत्काळ मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात उपचाराकरिता नेण्यात आले; मात्र इस्पितळात नेताना वाटेतच सुधीर कुमार याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – नवजात बालकं आगीत होरपळून दगावली, मातांचा आक्रोश

या घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलीस तत्काळ दाखल झाले. कुंकळ्ळी पोलिसांनी सदर कंपनीतील कामगारांना बाहेर काढले. तसेच कंपनी सील केली. मंगळवारी कारखाने व बाष्पक विभागाचे अधिकारी कुंकळी औद्योगिक वसाहतीत येऊन या कंपनीची पाहणी करतील व कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेबाबतचा अहवाल देतील.

हेही वाचा – Accident | भरधाव ट्रक थेट घरात घुसला

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

कुंकळ्ळी पोलिसांनी सुधीर कुमार याच्या मृत्यूप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली आहे. पोलिस तपास केला जाईल व तपासानंतर या घटनेला जबाबदार व्यक्तींवर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंद करण्यात येईल, असेही कुंकळ्ळी पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक डिकॉस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक पुढील तपास करत आहेत. सिलिंडर स्फोटाच्या या घटनेमुळे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा – FIRE | भीषण! बेताळभाटीत स्वयंपाकघर आगीच्या भक्षस्थानी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!