CYBER CRIME! स्वप्नीलच्या करामती पाहून पोलिसही थक्क

अटक करण्यात आलेल्या स्वप्नील नाईक याच्या विरोधात गोव्यासह कर्नाटकातही गुन्हे दाखल झाले आहेत.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : फेसबुकवर महिलेच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून अनेकांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने अट्टल गुन्हेगार स्वप्नील नाईक याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित नाईक याच्या विरोधात गोव्यासह कर्नाटकातही गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या विरोधात गोव्यात पाच, तर कर्नाटकात दोन गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. त्याने केलेले गुन्हे पाहून पोलिसही चक्रावले आहेत. हातोहात लाखो रुपयांची फसवणूक करणारा, अनेक वेळा अटक होऊनही जामिनावर बाहेर येऊन पुन्हा नवे सावज शोधणारा स्वप्नील नाईक याला शनिवारी पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

वेगवेगळ्या फसवणूक प्रकरणी पाच गुन्हे दाखल

संशयित स्वप्नील नाईक याच्या विरोधात वेगवेगळ्या फसवणूक प्रकरणी गोव्यात कुडचडे पोलिस स्थानकात दोन, सायबर विभागात दोन आणि पेडणे पोलिस स्थानकात एक, असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय कर्नाटकात बंगळुरू शहराच्या उप्परपेठ पोलिस स्थानकात एक आणि शिमोगा ग्रामीण पोलिस स्थानकात एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. संशयित स्वप्नील नाईक याला गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक विश्वेष कर्पे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक देवेंद्र पिंगळे व पथकाने दावणगिरी (कर्नाटक) येथून २४ ऑक्टोबर २०२० रोजी प्रथम अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतरही संशयिताचे कारनामे सुरूच असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर त्याने एका महिलेला ५ लाख ९० हजार रुपयांना गंडा घातला. बंगळुरू येथील एका हॉटेलची १ लाख ४३ हजार २४३ रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचाः ALERT! पेट्रोल भरताना तुमची अशी होते फसवणूक!

पहिला गुन्हा २०१४ मध्ये

संशयित स्वप्नील नाईक याच्या विरोधात कुडचडे पोलिस स्थानकात प्रथम गुन्हा ३० सप्टेंबर २०१४ रोजी दाखल झाला होता. त्यावेळी पंचवाडी येथील एका महिलेने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार, संशयित नाईक याने सुमारे ४६ जणांना आमिष दाखवून त्यांची २५ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची नमूद केलं होतं. संशयित स्वप्नील नाईक याच्या विरोधात कुडचडे पोलिसांनी भा.दं.सं. कलम ४६५, ४६८ आणि ४२० आर/डब्ल्यू ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी संशयित अल्पवयीन असल्यामुळे त्याची मेरशी येथील अपना घरात रवानगी करण्यात आली होती.

साडेपाच लाखांच्या फसवणूक प्रकरणात जामिनावर बाहेर

२०१६ मध्ये कुडचडे पोलिस स्थानकात स्वप्नील नाईक याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला. संशयित स्वप्नील नाईक याने काणकोण येथील एका व्यक्तीला सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून ५.५० लाख रुपयाची फसवणूक केली होती. या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी संशयित स्वप्नील याच्यासह इतर दोघा संशयितांना भा.दं.सं.च्या कलम ४६५, ४६८, ४२० आणि ४२० आर/डब्ल्यू ३४ नुसार अटक केली होती. त्यानंतर सर्व संशयितांची सशर्त जामिनावर सुटका झाली होती.

वकील असल्याचे सांगून ७ लाखांना गंडा

संशयित स्वप्नील याच्या विरोधात शिमोगा (कर्नाटक) ग्रामीण पोलिस स्थानकात ११ जून २०२० रोजी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार संशयित स्वप्नीलने २० मे २०२० ते १० जून २०२० दरम्यान वकील असल्याचे भासवून तक्रारदाराला व्यवसायात मदत करण्याच्या बहाण्याने त्याची ७ लाख २८ हजारांची फसवणूक केली. त्यावेळी संशयित स्वप्नीलने राहत असलेल्या घर मालकाची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शिमोगा ग्रामीण पोलिसांनी संशयित स्वप्नील विरोधात भा.दं.सं.च्या कलम ४१८, ३७९, ४१९ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

जामीन देण्याचे आमीष दाखवून ५ लाख ९० हजार उकळले

संशयित स्वप्नील याच्या विरोधात बंगळुरू शहराच्या उप्परपेठ पोलिस स्थानकात एका हॉटेलची १ लाख ४३ हजार २४३ रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित स्वप्नील विरोधात भा.दं.सं.च्या कलम ४२० नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संशयिताने सबंधित हॉटेलमध्ये चार खोल्या घेतल्या होत्या. एक खोली त्याने स्वतःसाठी, दोन खोल्या खासगी सुरक्षा रक्षकांसाठी तर आणखी एका खोलीत एका महिलेला ठेवले होते. सबंधित महिलेला ५ लाख ९० हजार रुपयांचा त्याने गंडा घातला. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी २५ जानेवारी २०२० रोजी संशयित स्वप्नील विरोधात भा.दं.सं.च्या कलम ५०६ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संशयिताने संबंधित महिलेला तिच्या पतीला जामीन मिळवून देतो असे आमिष दाखवले होते. तिच्या पतीला अमलीपदार्थ विरोधी पथकाने २९ नोव्हेंबर २०२० रोजी १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे २.५ किलो चरस बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकारणात पतीला जामीन मिळवून देण्यासाठी स्वप्नील नाईकने संबंधित महिलेला हैद्राबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत जाऊन अमली पदार्थ अहवाल बदलण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी तिला बंगळुरू येथे बोलावलं आणि संबंधित हॉटेलात बंद करून ठेवलं. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केल्यानंतर तिने पेडणे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

हेही वाचाः येथून उजवीकडे वळा…! आता गुगल बोलणार मराठी भाषा!

महिलेचं नाव धारण करून फेसबूकद्वारे ४३ लाखांना टोपी

१. संशयित स्वप्नील विरोधात पर्ये-सत्तरी येथील एका व्यक्तीने सायबर गुन्हा विभागात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, संशयिताने फेसबुकच्या माध्यामातून २०१८ मध्ये प्राची गावकर या नावाने बनावट अकाऊंट सुरू करून तक्रारदाराशी मैत्री करून लग्नाचं आमिष दाखवलं. संशयिताने तक्रारदाराकडून २० लाख रुपये उकळले आणि फसवणूक केली. याप्रकरणी विभागाने संशयिताच्या विरोधात भा.दं.सं.च्या कलम ४१९ व ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ डी खाली गुन्हा दाखल केला होता.
२. संशयित स्वप्नीलने फेसबुकवर साखळी येथील एका व्यक्तीला महिला असल्याचे भासवत बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे लग्नाचे आमिष दाखवलं. २७ जून २०२० ते १६ सप्टेंबर २०२० या कालावधीत आपल्याकडून २३.२१ लाख रुपये उकळल्याची तक्रार सायबर गुन्हे विभागाकडे पीडित व्यक्तीने केली होती. या प्रकरणी विभागाने त्याच्या विरोधात भा.दं.सं.च्या कलम ४१९ व ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ डी खाली गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!