सत्तरीत संचारबंदीचा आदेश फक्त कागदोपत्री; अंमलबजावणी नाही

केरी भागात दुकाने रात्रीपर्यंत सुरू; राज्यव्यापी कर्फ्यूचे तीनतेरा

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः राज्य सरकारने लागू केलेली संचारबंदी ही सत्तरी तालुक्यातील फक्त कागदोपत्री  शिल्लक राहिली आहे. याची अंमलबजावणी अजिबात होत नसल्याचं चित्र समोर आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून पावसाळी मोसमात या भागात रुग्णांची संख्या वाढल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जातोय.

हेही वाचाः चीनच्या वुहानमध्येच कोरोना विषाणू तयार!

केरी भागात दुकाने रात्रीपर्यंत सुरू

राज्य सरकारने 7 जूनपर्यंत संचारबंदीत वाढ करत असल्याची घोषणा शनिवारी केली. गेल्या पंधरा दिवसांपासून गोव्यात संचारबंदी लागू आहे. मात्र या संचारबंदीचं सत्तरी तालुक्याला काहीच पडलेलं नाही. खासकरून वाळपई शहरात आणि केरी भागांत या संचार बंदीचा आदेश फक्त कागदोपत्रीच शिल्लक आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र समोर आहे. वाळपईत सकाळच्या सत्रात जवळपास सर्वच दुकाने खुली असल्याचं पहायला मिळतं. यामुळे काही दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. नगरपालिकेची यंत्रणा यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे या भागात रुग्णांची संख्या वाढल्यास चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार आहे.

हेही वाचाः त्रिवार सलाम : कोरोना संकटात ‘कृष्णा’च्या नर्सच बनल्या ‘यशोदा’ !

राज्यव्यापी कर्फ्यूचे तीनतेरा

दरम्यान सत्तरीतील केरी भागात रात्रीच्या वेळीही काही दुकानं बिनधास्तपणे खुली असतात. या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचंही पहायला मिळतंय. या भागाकडे पोलिस यंत्रणा अजिबात लक्ष देत नाही. यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोवा-बेळगाव दरम्यानच्या महामार्गाशेजारी दोनमाड या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत काही  दुकानं खुली असतात. यातील काही दुकानं रात्री दहा वाजेपर्यंत खुली असतात. याठिकाणी अनेकदा स्तरावर गर्दी पहायला मिळते. दुर्दैवाची बाब अशी की या भागातील लोकप्रतिनिधी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आणि सरकारी यंत्रणेला धाक दाखवून ही दुकानं खुली ठेवत आहेत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय अधिकाराचा फायदा घेऊन अशा प्रकारे सरकारच्या संचारबंदीला उघडपणे आव्हान देऊन रोगाच्या फैलावाला  एक प्रकारे निमंत्रण देण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. या भागातील पंचायत मंडळांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!