गोवा राज्यात 16 ऑगष्टपर्यंत कर्फ्यू वाढला

केरळातून येणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील कर्फ्यू 16 ऑगष्ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवला आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश जारी केलेत. सध्याच्या कर्फ्यूची मुदत सोमवारी 9 रोजी संपणार होती. अखेर मुदतवाढीचा आदेश रविवार 8 रोजी संध्याकाळी जारी करण्यात आला.

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर बऱ्यापैकी मंदावलेला आहे. तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यात कर्फ्यूवाढीचं सत्र सुरुच ठेवण्यात आलंय. मागच्या आदेशातच बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आल्याने ती कायम ठेवण्यात आलीए. राज्यात कर्फ्यूला मुदतवाढ देण्यात आली असली तरी जनजीवन मात्र पूर्ववत झाल्याचीच परिस्थिती असून मास्कचा वापर आणि सामाजिक अंतराचे तीन तेरा सुरू आहेत.

अटींची शिथिलता आणि लोक मोकळे

मागच्या आदेशात बार आणि रेस्टॉरन्ट रात्री ११ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच परराज्यांतून येणाऱ्यांना विशेषतः केरळ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक ठेवला आहे. हा आदेश तसाच लागू असेल. राज्यव्यापी कर्फ्यू 16 ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत असेल. बार आणि रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत.

कोविड प्रमाणपत्र सक्तीचंच

सध्या केरळात करोना रुग्ण वाढत असल्याने तेथून येणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य केले आहे. तर अन्य राज्यांतून गोव्यात दाखल होताना ७२ तासांपर्यंत कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अथवा नाक्यांवर आरटीपीसीआर चाचणीची सोय करण्यात आलीए. शिक्षण संस्था तूर्त बंदच राहणार असल्या तरी शाळा, महाविद्यालयांना परीक्षा घेण्याची मोकळीक मागच्याच आदेशात देण्यात आलीए.

कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, मल्टिप्लेक्स बंदच असतील. दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. पेट्राेल पंप, फार्मसी, इस्पितळे, गॅस सेवा पूर्वीप्रमाणेच कायम असतील. कोविडची दुसरी लाट उसळल्याने राज्यात ९ मे रोजी सर्वप्रथम राज्यव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर २४ ते ३१ मे पर्यंत त्यात वाढ देऊन दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर दर आठवड्याला कालावधी संपल्यानंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली. दरवेळी मुदतवाढ देताना काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!