हा म्हणजे कर्ज काढून सण साजरा करण्याचा प्रकार

भाजपचे आमदार निळकंठ हळर्णकर यांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांना गृहीत धरू नये. केजरीवाल यांनी गोमंतकीयांना दिलेलं मोफत वीजेचं आश्‍वासन म्हणजे कर्ज काढून सण साजरा करण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी केली. भाजपच्या येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस उपस्थित होते.

हेही वाचाः नारायण नाईक हल्ला प्रकरणः हल्लेखोर आरोपी इस्माईल शेखला अटक

वीज मोफत देण्याच्या योजनेमुळे आज दिल्ली सरकारवर कर्जाचा डोंगर

अरविंद केजरीवाल यांना गोव्यातील स्थितीची माहिती नाही. तसंच वीज मोफत देणं शक्य नसल्याचं आज आमचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी दिल्लीच्या विजमंत्र्यांशी झालेल्या वादविवादावेळी पटवून दिलं आहे. वीज मोफत देण्याच्या योजनेमुळे आज दिल्ली सरकारवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. तसंच वीज पुरवणार्‍या कंपन्यांचे पैसे थकले आहेत. मात्र ते त्याविषयी काही बोलत नाहीत. केवळ लोकांना भुलथापा देण्याचं काम ‘आप’कडून सुरू असल्याचं हळर्णकर म्हणाले.

हेही वाचाः Assam-Mizoram Border Conflict | आसाम-मिझोराम सीमा संघर्षाला हिंसक वळण

गोमंतकीय नागरिक भुलथापांना बळी पडणारा नव्हे

गोमंतकीय नागरिक भुलथापांना बळी पडणारा नव्हे. येथील कष्टकरी समाज मोफत विजेच्या अमिषालाही बळी पडणार नाही, असंही हळर्णकर म्हणाले. आपने दिल्लीवासीयांना यापूर्वी दिलेली अनेक आश्‍वासनं पूर्ण केलेली नाहीत. त्यांचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी कोविड काळात केंद्र सरकारकडे 5 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. एकीकडे पैसे नाहीत म्हणून केंद्राकडे हात पसरायचा आणि दुसरीकडे मोफत देण्याच्या घोषणा करायच्या, एवढंच त्यांना जमतं. आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि मतदारसंघातील नागरिकांच्या प्रगतीसाठी आम्ही भाजपमध्ये दाखल झालो. यामुळे आम्ही विकलो गेलो म्हणण्याचा अधिकार केजरीवाल यांना नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. सुरुवातीच्या काळातील त्यांचे अनेक सहकारी आज अन्य पक्षात गेले आहेत. तर काहीजणांनी केजरीवाल यांच्या अरेरावीला कंटाळून अन्य वाटा शोधल्या आहेत, असंही हळर्णकर म्हणाले.

हेही वाचाः निष्काळजीपणा: बोलण्यात गुंग होता नर्सिंग स्टाफ; महिलेच्या दोन्ही हातावर टोचली लस; तब्येत बिघडली

प्रत्यक्षात केजरीवाल खोटं बोलले

अरविंद केजरीवाल नुकतेच गोव्यात आले होते. त्याचवेळी दिल्लीतील एक चर्च पाडण्यात आला. त्यासंबंधी गोमतंकीय पत्रकारांनी विचारलं असता या घटनेची मला अधिक माहिती नाही, असं साचेबद्ध उत्तर दिलं होतं. प्रत्यक्षात केजरीवाल खोटं बोलले. कारण या चर्चसंबंधी स्थापन केलेल्या समितीत त्यांच्या पक्षाचे दोन आमदार होते. त्यांनी ही कारवाई का थांबवली नाही, असा सवाल फर्नांडिस यांनी केला. दिल्लीतील अल्पसंख्याकांच्या धर्मस्थळावर कारवाई करणारे केजरीवाल दिल्ली येथील चर्चवरील कारवाईवेळी गोव्यात पळून आले. आणि या प्रकरणापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील अल्पसंख्याकांना याची चांगलीच माहिती आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी खोटं बोलून येथील अल्पसंख्याकांना गृहीत धरू नये, असं आमदार टोनी फर्नांडिस म्हणाले.

हेही वाचाः CORONA UPDATE | सोमवारी पुन्हा 4 कोविडबाधितांचा मृत्यू

केजरीवाल यांच्या अमिषाला गोमंतकीयांनी बळी पडू नये

बाहेरून गोव्यात येऊन मतांसाठी खोटं बोलणार्‍या आणि अल्पसंख्याकांचं धर्मस्थळ पाडणार्‍या केजरीवाल यांच्या अमिषाला गोमंतकीयांनी बळी पडू नये. खोटे बोल पण रेटून बोल अशा पवृत्तीच्या आपच्या नेत्यांची डाळ गोमंतकीय शिजू देणार नाहीत. वीज मोफत देणं आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. कारण आता कर्ज काढून लोकांना मोफत गोष्टी दिल्या तर आगामी काळात ते फेडावंच लागेल. म्हणजेच आपल्या भावी पिढ्यांवर कर्जाचा डोंगर करणं कितपत योग्य आहे, असा सवालही यावेळी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी केला.

हा व्हिडिओ पहाः Covid 19 | Inside Story | नवनव्या कोरोना व्हेरिएंटमुळे प्रगत देशही हतबल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!