कुख्यात गुंड टायगरला जीवे मारण्यामागचं कारण ‘हे’ आहे?

कुणी केला हल्ला? का केला हल्ला?

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : कुख्यात गुंड अन्वर शेख उर्फ टायगर याच्यावर फातोर्डा आर्लेम जंक्शनजवळ जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयित रिकी होर्णेकर याला अटक केली असून आणखी दोघा संशयितांचा शोध सुरू आहे. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. शेख याच्या पायावर गोळी लागल्याची खूण आढळली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

anwar new
anwar new

फातोर्डा परिसरात गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. फातोर्डातील आर्लेम सर्कलनजीक दिवसाढवळ्या कुख्यात गुंड अस्लम शेख याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कुख्यात गुंड अन्वर शेख गंभीर जखमी झाला आहे. जखमी गुंड अन्वर शेख याला उपचारासाठी प्रथम मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठविण्यात आले. हल्ल्यासाठी वापरलेला कोयता ताब्यात घेण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव रिकी होर्णेकर असून तो सावर्डे येथील असल्याचे समजते. या प्रकरणी इतर दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ –

हा प्रकार घडल्यानंतर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. फातोर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आर्लेम जंक्शननजीक एका व्यक्तीवर खुनी हल्ला झाल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक कपिल नायक सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी गेले असता एक व्यक्ती जखमी अवस्थेत दिसून आली. चौकशीअंती जखमी व्यक्ती ही मडगाव पोलिस स्थानकात विविध गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड अन्वर शेख असल्याचे समोर आले. पोलिसांनी जखमी अन्वर शेख याला उपचारासाठी हॉस्पिसियो इस्पितळात नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी अन्वर शेखवर खुनी हल्ला करण्यात सहभागी असलेल्या संशयित रिकी होर्णेकर याला ताब्यात घेतले.

चौकशीअंती खुनी हल्ल्यात सहभाग असल्याचे उघड झाल्यावर त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून हल्ला करण्यात आणखीही दोन व्यक्ती असल्याचे समोर आले. गोमेकॉत उपचार घेत असलेल्या अन्वर याचा जबाबही फातोर्डा पोलिसांनी घेतला आहे. फरार दोन व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

फातोर्डा पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले की, गुंड अन्वर शेख याच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी रिकी होर्णेकर संशयितास अटक करण्यात आली आहे. आणखी दोन व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. हल्ल्यासाठी वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. अन्वर शेख याच्या पायावर गोळी मारल्याची खूण आढळून आलेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिल्याचंही फातोर्डा पोलिसांनी सांगितले.

सुमारे दहा जणांनी हल्ला केल्याचा अन्वरचा जबाब

गोमेकॉत उपचारासाठी दाखल असलेल्या अन्वर शेख याचा जबाब पोलिसांनी घेतला. यावेळी अन्वर याने रिकी होर्णेकर, तिळामळ केपे येथील वेल्ली डिकोस्टा, सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी, खारेबांद येथील विपुल पट्टरी याच्या व्यतिरिक्त आणखी सहा अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा जबाब दिला आहे. हल्लेखोरांनी लोखंडी सळी, कोयता, दांडा यांच्या सहाय्याने मारहाण केली. एका व्यक्तीने गोळी झाडल्याचेही त्याने जबाबात सांगितले.

. . . सॅमी तावारीस यांच्यामुळे वाचला अन्वर

अन्वर शेख याच्यावरील हल्ल्यावेळी कोकण रेल्वेचे पोलिस अधीक्षक सॅमी तावारीस हे त्या मार्गावरून जात होते. सॅमी तावारीस यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे अन्वर शेख याचा जीव वाचला. याबाबत अधीक्षक तवारीस यांनी सांगितले की, कार्यालयीन वाहनातून आर्लेम जंक्शनकडून जात असतानाच काहीजण दांडा, लोखंडी सळी, कोयता घेऊन एका व्यक्तीच्या मागे धावत असल्याचे दिसले. प्रथमतः एखाद्या फिल्मची शुटिंग सुरू असल्याचाच भास झाला. मात्र पुढे जाताच हे शूटिंग नसून मारहाणीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे चालकाला गाडी वेगात हाकण्यास सांगितली. पाच व्यक्ती एका व्यक्तीला मारण्यासाठी धावत असल्याचे लक्षात आले. पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहताच तिघेजण दुसऱ्या बाजूला पळून गेले. गाडी नजीक जाताच दांडा घेऊन धावणारी व्यक्ती दुसऱ्या बाजूला पळाली. मात्र कोयता घेऊन धावणारी व्यक्ती पाठलाग करतच राहिली. ती कोयत्याने वार करणार एवढ्यातच गाडी त्यांच्यापर्यंत पोहोचली.

पोलिसांची गाडी पाहताच ती व्यक्ती दुसरीकडे पळू लागली. मात्र सहकाऱ्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला पकडले आणि फातोर्डा पोलिसांच्या ताब्यात दिले. मारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती रिकी होर्णेकर तर ज्यांच्यावर हल्ला करण्यात आला तो गुंड अन्वर शेख असल्याचे नंतर समजले, असे सॅमी तावारीस यांनी सांगितले.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप तरी एकाच व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध भागात पथके पाठविण्यात आलेली आहेत, असे सिंग यांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी आणखी काही जणांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.

हल्ल्यामागे अमलीपदार्थाचे कनेक्शन ?

अन्वर शेख याने दिलेल्या जबाबात केपे येथील वेल्ली डिकोस्टा, सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी यांची नावे घेतलेली आहेत. वेल्ली तसेच इम्रान बेपारी यांच्यावर अमलीपदार्थ विक्री प्रकरणी गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे हा हल्ला अमली पदार्थाच्या देवाणघेवाणीवरूनच झालेल्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!