पत्रादेवी येथे चेकनाक्यावर खासगी बसमधील तिघा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद

कोविड तपासणीसाठी न थांबता बस भरवेगात नेल्याने कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे: सध्या करोनाचा काळ असल्याने पत्रादेवी चेकनाक्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी सुरू आहे. या तपासणीपासून पळून जाण्याच्या उद्देशाने काही खासगी बसेस या चेकनाक्यावर तपासणीसाठी न थांबवता वेगाने हाकल्या जात आहेत. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी मंगळवारी करोना तपासणीसाठी चेकनाक्यावर खासगी बस थांबवली नसल्याच्या कारणावरून बसमधील तिघा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली व बस ताब्यात घेतली.

स पत्रादेवी चेकनाक्यावर तपासणीसाठी न थांबता भरधाव वेगात गेली

पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मंगळवारी सकाळी ९.१५च्या सुमारास एमएच-४७ एएस-३४६४ या क्रमांकाची एक महाराष्ट्रातील बस पत्रादेवी चेकनाक्यावर तपासणीसाठी न थांबता भरधाव वेगात गेली. पोलिसांनी त्या बसचा पाठलाग करून पुन्हा ती बस चेकपोस्टवर आणली.या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

तीन कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर नोंद

या प्रकरणी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आणि सत्यवान हरजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. त्या बसमधील कर्मचारी समीर आंबेकर (रत्नागिरी), सगुण नाईक (आरोंदा) आणि सिद्धार्थ शिंदे (बोरीवली – मुंबई) यांना अटक करण्यात आली. पेडणे पोलिसांनी खासगी बसही ताब्यात घेतली. त्यानंतर सर्व प्रवाशांना नियोजित स्थळी पोचवण्यासाठी पेडणे पोलिसांनी वाहनाची सोय केली.
दळवी यांनी सांगितले, तैनात दंडाधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी नेहमी पत्रादेवी चेकनाक्यावर सतर्क असतात आणि ही घटना त्यांच्या सतर्कतेचे उत्तम उदाहरण आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!