CRIME | पैसे देत नाही म्हणून बहिणीच्या डोक्यात घातली क्रिकेट बॅट

नागवा येथील घटना; भावाने घेतला बहिणीचा बळी; संशयित भावाला अटक; हणजूण पोलिसांची कारवाई

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः फुलडेवाडा नागवा येथे क्रिकेट बॅटने लहान भावाकडून बहिणीचा खून करण्याची घटना घडलीये. मयत युवतीचे नाव अनासुया प्रसादाप्पा लमाणी (वय, 26) असं असून शेखाप्पा प्रसादाप्पा लमाणी (वय, 20) असं संशयिताचं नाव आहे. हे दोघेही मूळ कर्नाटकातील जलशंकर नगर, गदग येथील आहेत. संशयिताला हणजूण पोलिसांनी गदग पोलिसांच्या मदतीने काही तासांतच पकडलंय.

हेही वाचाः CRIME | एलएसडी, गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

9 जूनची घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खूनाची घटना बुधवार 9 जून रोजी घडली. शुक्रवार 11  जून रोजी रात्री पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पहाटेच पोलिसांनी संशयिताला पकडून अटक केली. शुक्रवारी सांयकाळी उशारी मयताच्या बंद खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. हा प्रकार शेजारी भाडेकरूंनी घर मालकाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर घर मालकाने घटनेची माहिती हणजूण पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षत सुरज गावस, उपनिरीक्षक अमीर तरल, महेश केरकर तसंच सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

भावाकडून बहिणीचा खून

पोलिसांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता कुजलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळला. मयत युवतीच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. खून करण्यासाठी वापरलेली क्रिकेट बॅट तिथे जवळच पडली होती. बॅटलाही रक्त लागलं होतं. त्यामुळे खूनासाठी बॅटचाच उपयोग केला असल्याचं स्पष्ट झालं. शेजार्‍यांनी सदर मृतदेह अनासुया लमाणी हिचाच असल्याची ओळख पटवली.

हेही वाचाः CRIME | कुंडईत भावाकडून भावाचा खून; संशयिताला अटक

संशयित भावाविरुद्ध गुन्हा दाखल

मयत युवतीचा भाऊ बुधवारी संध्याकाळपासून गायब असल्याचं शेजार्‍यांनी सांगितलं. त्याबरोबर पोलिसांचा संशय बळावला. मयत युवतीचा मोठा भाऊ हेमाप्पा लमाणी हा बागा येथे वास्तव्यात होता. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी घटनेची माहिती त्याला दिली आणि नंतर हेमाप्पा लमाणी याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित शेखाप्पा लमाणी याच्या विरूद्धा भा.दं.संहितेच्या 302 कलमाखाली गुन्हा दाखल केला.

संशयिताला कर्नाटकातून अटक

संशयित आरोपी जलशंकर नगर गदग येथे मूळ गावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे एक पोलिस पथक गदग येथे रवाना झालं. गदग पोलिसांच्या सहाय्याने संशयिताला पोलिसांनी अटक केली.

हेही वाचाः CRIME | हणजुण येथे चोरी प्रकरणी एकास अटक

पैसे देत नाही म्हणून कडाक्याचं भांडण

मयत युवती ही मोलकरीण म्हणून नागवा परिसरात काम करायची, तर संशयित आरोपी बेरोजगार होता आणि बहिणीच्या मिळकतीवरच तो उदारनिर्वाह करत होता. बुधवारी 9 जून रोजी बहीण पैसे देत नसल्यानं दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. या भांडणाच्या रागातून संशयिताने खोलीतील क्रिकेट बॅट घेऊन बहिणीच्या डोक्यात वार केला. बहिणीचा मृत्यू झाल्याचं समजताच तिचा मृतदेह तिथेच टाकून, खोलीचे खिडकी-दरवाजा बंद करून त्याने पळ ठोकली.

पुढील तपास सुरू

संशयिताने थेट जलशंकर नगर, गदग येथील आपलं मूळ घर गाठलं. बहिणीने आपल्याला घरी पाठवलं असल्याचं त्याने घरच्यांना सांगितलं. गेले दोन दिवस संशयित घरी आरामात रहात होता. संशयितास अटक करून पोलिस रात्री उशीरा हणजूणमध्ये घेऊन आलेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!