हडफडेत आयपीएलवर कोट्यवधींची सट्टेबाजी

तिघा गुजरातींना अटक, कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमधून चालवत होते बेटिंग रॅकेट

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एक आयपीएल सट्टेबाजीचं रॅकेट उघडकीस आणलं. उत्तर गोव्यातल्या हडफडे इथून तिघा गुजराती इसमांना अटक करत त्यांच्याकडून बेटिंग संबंधीचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलिस निरीक्षक राहुल परब, निरीक्षक चिमुलकर, उपनिरीक्षक नितीन यांनी ग्रीन व्हिजन, हडफडे इथल्या एका व्हिलावर रविवारी रात्री छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी गांधीधाम-गुजरात इथल्या तिघांना अटक केली असून शक्ती पंजाबी, विशाल आहुजा, हितेश केशवानी अशी त्यांची नावं आहेत. ते मोबाईल फोनवरून सट्टेबाजीसाठी रक्कम स्वीकारत होते.

गुजराती सट्टेबाज, गुजराती ग्राहक

सट्टेबाजीचं रॅकेट हडफडेतून चालविलं जात असलं, तरी त्याचे धागेदोरे गुजरातशी जोडले गेले होते. एक व्हिला भाडेतत्त्वावर घेउन तिघे गुजराती सट्टेबाज गुजरातमधील आपल्या मित्रांच्या माध्यमातून सट्टा लावण्यासाठी रक्कम स्वीकारत होते.

कोट्यवधींची उलाढाल

हायटेक कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बेटिंग हाताळलं जात होतं. या रॅकेटचे सूत्रधार त्यासाठी पूर्ण खबरदारी घेत होते. आपण पकडले जाउ नयेत, यासाठी ते गुजरातमधील आपल्याच मित्र परिवारातील लोकांना सट्टा लावण्यासाठी प्रवृत्त करत होते. हा सट्टा गोव्यात राहून गुजराती ग्राहकांच्या माध्यमातून चालविला जात होता. या तिघांनी आतापर्यंत एक कोटींहून अधिक रकमेचा सट्टा लावल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र त्यांचं बिंग फोडण्यात गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं यश मिळविलं.

हेही वाचा…

कळंगुट पोलिसांकडून आणखी एक बेटिंग रॅकेट उद्ध्वस्त

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!