सरकारची सकारात्मक प्रतिमा तयार करा

मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकाऱ्यांना आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनसंपर्क अधिकारी आणि सरकारी खात्यांतील प्रमुखांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया अशा मुख्य व्यासपीठावर येणाऱ्या प्रतिकूल प्रसिद्धीचा प्रतिकार करण्यासाठी आणि सकारात्मक आशय निर्माण करण्यासाठी योग्य नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. या प्रयत्नांमुळे सरकारच्या कार्याची आणि उपक्रमांची माहिती मिळविण्यास आणि पुढील सहा महिन्यांत योग्य दृष्टीकोनातून त्यांची सकारात्मक प्रतिमा विकसित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल असंही ते म्हणाले.

हेही वाचाः सलग दुसऱ्या दिवशी राज्यात 6 रुग्ण दगावले!

अचूक बातम्या तयार करण्याची गरज

पर्वरी येथील सचिवालयातील परिषदगृहात माहिती आणि प्रसिद्धी खात्याने पीआरओ, एचओडी आणि ओएसडीना त्याना त्यांची भूमिका आणि जबाबदारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलताना मुख्यमंत्र्यानी अचुक बातम्या तयार करण्याची गरज असल्याचं सांगितलं. आपलं सरकार राज्य आणि लोकांच्या हितासाठी काम करत आहे, असा भक्कम संदेश देऊन विश्वासार्हता मिळविण्याबद्दल ते म्हणाले.

हेही वाचाः आजीओने आणला देशातील ‘बिग बोल्ड सेल’

जे सहजतेने उपलब्ध आहे त्याचा उत्तम प्रकारे उपयोग करावा

मुख्यमंत्र्यानी पीआरओंनी सरकारवरील टीकेला तोंड देण्यासाठी स्पष्टीकरण आणि खंडन करण्यासाठी आवश्यक माहिती आठ दिवसांनंतर प्रकाशित करण्याऐवजी दुसर्‍याच दिवशी प्रकाशित करणं आवश्यक असल्याचं सांगितले. ते म्हणाले, प्रिंट मीडियाबरोबरच सरकारी खात्यानी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचा अधिकाधिक उपयोग करावा. ज्यामुळे श्रोते आणि दर्शकांची संख्या चांगली निर्माण होईल आणि कोविड -१९ महामारीच्या काळात आवश्यक जागृती निर्माण करण्यासाठी रेडिओ माध्यमाने निर्णायक आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जे सहजतेने उपलब्ध आहे त्याचा आपण उत्तम प्रकारे उपयोग केला पाहिजे आणि या संदर्भात त्यांनी सत्तरी तालुक्यातील केरी येथील चेक पोस्टला दिलेल्या अलिकडच्या भेटीचा उल्लेख केला ज्यामध्ये प्रिंट आणि इतर माध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दिली असं ते म्हणाले.

हेही वाचाः टीटोजच्या नावाखालील #टिवटिवाट

पीआरओनी सकारात्मक बाबींवरही विचार करावा

कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना मुख्यमंत्र्यांनी खात्यांतील कॅलेंडरचे कार्यक्रम माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार ठेवण्याची गरज व्यक्त केली. माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि मुख्यमंत्री कार्यालय सकारात्मक गोष्टी जाहीर करण्यासाठी पीआरओना सहकार्य देतील. पीआरओ सकारात्मक निवेदनातही योगदान देऊ शकतात. त्यांनी सकारात्मक बाबींवरही विचार करावा आणि प्रतिकूल प्रसिद्धीला उत्तर द्यावं, असंही ते म्हणाले.

हेही वाचाः पर्यटन महामंडळातर्फे मांद्रेत ३०० कोटींच्या मनोरंजन सिटीला मंजुरी

विकासाच्या मुख्य प्रवाहात पीआरओचं काम महत्त्वपूर्ण

पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक विनोद कुमार डी.व्ही आयआयएस यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना  माहिती युगातील सत्यता यासंबंधी पीआरओनी स्वतः माहिती करून घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की विकासाच्या मुख्य प्रवाहात पीआरओचं काम महत्त्वपूर्ण आहे. डिजिटल किंवा प्रिंट अशा दळणवळणाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला त्यांनी पीआरओना दिला. त्यांनी निरीक्षण, अभिमुख, निर्णय आणि कार्य या चार बाबींवर भर दिला. पीआरओना त्यांच्या संबंधित खात्यांचं सखोल ज्ञान असावं असं ते म्हणाले.

हेही वाचाः गोव्यातील गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्यात पर्यटन मंत्री अपयशी

सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर आवश्यक

सोशल मीडियासंबंधी बोलताना मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त खाजगी सचिव गौरीश कळंगुटकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्वांना सहज उपलब्ध असून त्याद्वारे कोणतीही व्यक्ती आपलं मत व्यक्त करू शकते असं सांगितलं. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यावर त्यांनी भर दिला, ज्यायोगे सरकारला त्याचा फायदा होईल. सर्वसामान्यांच्या आणि सरकारच्या नजरेत आपली सकारात्मक प्रतिमा विकसित करण्यासाठी सरकारचे महत्त्वपूर्ण टप्पे आणि कार्याशी संबंधित निर्मितीवरही ते बोलत होते. माध्यमांतून समोर येणाऱ्या टिकात्मक अहवालावर त्वरित कार्य करण्यासाठी खात्यांतील अंतर्गत समन्वयाला महत्व असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचाः ‘डॉक्टर डे’च्या दिवशीच पुण्यातील डॉक्टर दांपत्याची आत्महत्या

माहिती व प्रसिद्धी खात्याचे सहाय्यक माहिती अधिकारी श्याम गावकर यांनी सरकारची सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी सदर खातं कसं काम करत आहे याची सविस्तर माहिती दिली. आपल्या स्वागतपर भाषणात माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दिपक बांदेकर यांनी विविध सरकारी खाती, महामंडळे आणि स्वायत्त संस्था यांच्याशी अधिक चांगला समन्वय असणं हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं. तात्काळ माहिती मिळविण्यासाठी सदर खात्याने पीआरओ आणि एचओडी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांचं एक समर्पित पथक सुरू केल्याची माहिती दिली. साहाय्यक माहिती अधिकारी श्याम गावकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!