COVID VACCINATION AWARNESS | घर घर डोस…

गोवा भाजपचा अभिनव उपक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः भाजप स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी साजरा होतोय. यानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रम, उपक्रमांची रेलचेल सुरू राहणारेय. गोवा भाजपने मात्र एक अभिनव उपक्रम हाती घेण्याचं ठरवलंय. निवडणूकीच्या वेळी मतदान केंद्रांवर जसं मतदारांना आणतात त्या पद्धतीनं कोरोना लसीकरणासाठी पात्र नागरीकांना लसीकरण केंद्रावर आणून जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करून घेण्याचा संकल्प भाजपने केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तसे स्पष्ट निर्देश कार्यकर्त्यांना दिलेत. एवढंच नाही तर प्रत्येक कार्यकर्त्यांने त्यांनी सांगितल्यावरून कितीजणांनी लसीकरण करून घेतलं याची यादीच सादर करा, असंही सांगितलंय.

राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढतंय

राज्यात कोरोनाचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा आणि जनतेतही अद्याप विशेष गांभिर्य आढळून येत नाहीए. पहिल्या कोरोना लाटेच्यावेळी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वं गायब झालीत. कुणालाही कुणाचाही पायपोस नसल्याची परिस्थिती ओढवलीय. इथले राज्यकर्तेच मुळात बेजबाबदारपणे वागून जनतेचा गोंधळ उडवताहेत. एकीकडे आरोग्यमंत्री विश्वजित राणे निर्बंध लागू करण्याची भाषा बोलतात, तर दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र काळजी घ्या पण लॉकडाऊन नाही, असं सांगतायत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी तज्ज्ञ समितीची बैठक घेतली. या बैठकीत वेगवेगळे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सगळ्यात पहिलं काम म्हणजे मोठ्या प्रमाणात चाचण्या हाती घेणं होता. या अनुषंगाने रोचे हे खास मशीन खरेदी करण्याचं ठरलं. या मशिनाच्या सहाय्याने दर दिवशी 2500 ते 3 हजार चाचण्या करता येतात. या व्यतिरीक्त दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील खाटांची संख्या 300 करावी, असंही या बैठकीत ठरलं. ईएसआय इस्पितळ कोविड केअर सेंटरमध्ये कार्यन्वीत होईल. या व्यतिरीक्त चाचण्यांचं जेनॉमिक परिक्षण करण्याचंही सरकार ठरवतंय. याव्दारे कोरोना विषाणूंच्या वेगवेगशळ्या प्रकारांची माहिती होण्यात मदत होईल. यासाठी सुमारे दीड कोटी खर्चून साधनसुविधा निर्माण करण्याचंही या बैठकीत ठरलंय.

मर्यादित निर्बंध लागू करणार

राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीकडून कोरोनाच्या अनुषंगाने काही ठिकाणी मर्यादित निर्बंध लागू केले जातील, असे संकेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिले. पुढील तीन ते चार दिवसांत हे निर्बंध जारी होतील, असंही ते म्हणालेत.

लसीकरणाला अल्प प्रतिसाद

राज्यात सध्याच्या परिस्थितीत 2180 सक्रीय कोरोना रूग्ण आहेत. मागील आठवड्यापासून दरदिवशी 200 च्या आसपास नवे रूग्ण सापडताहेत. एकूण मृतांचा आकडा 837 बनलाय. आत्तापर्यंत राज्यात 59315 कोरोना रूग्णांची नोंद झालीय, तर 56298 रूग्ण बरे झालेत. बरे होण्याचं प्रमाण 94.91 टक्के आहे. एकूण 16630 रूग्णांना इस्पितळात दाखल करावं लागलं. 31866 रूग्णांनी घरीच विलगीकरणाचा पर्याय निवडला 5,55,457 चाचण्या आत्तापर्यंत केल्यात. सध्या दिवसागणिक सुमारे 2 हजार नव्या चाचण्या केल्या जातायत. विशेष म्हणजे उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये 275 खाटांची सोय केली आहे आणि या सर्व खाटा रिकामी आहेत, तर दक्षिण गोव्यातील 144 खाटांपैकी 109 खाटा रिकामी आहेत. राज्यात आत्तापर्यंत 1,36,376 जणांनी कोविड लस घेतलीय. यापैकी पहिला डोस 1,13,540 जणांनी घेतलाय तर दुसरा डोस 22,836 जणांनी घेतलाय.

जीएमसी करणार लसीकरण जागृती

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून दर दिवशी कोविड लसीकरण मोहिम चालवली जातेय. सार्वजनिक सुट्ट्या आणि रविवारीही लसीकरणाची सोय केलीए. 45 वर्षांवरील सर्व नागरीक तसंच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी यांनी तत्काळ लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन डॉ. जगदीश काकोडकर यांनी केलंय. जीएमसीच्या कोविड लसीकरण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून डॉ. काकोडकर काम बघतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!