शनिवारी कोरी झालेली मृतांची पाटी पुन्हा भरली! 6 दगावले, 24 वर्षांच्या तरुणाचाही दुर्दैवी अंत

गाफील राहू नका, धोका टळलेला नाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्याचं जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाहायला मिळालं. अनेकदा राज्यातील मृतांची पाटी जुलै महिन्यात जरी कोरी राहिली असली, तरीही कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, हे रविवारी पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. एकीकडे शनिवारी जरी मृतांची पाटी कोरी राहिली असली, तरिही पुढच्या 24 तासांतच पुन्हा एकदा कोरोना बळींची आकडा हा चिंताजनक असल्याचं पाहायला मिळालंय. एकूण 6 जण कोरोनामुळे दगावल्याची नोंद रविवारी करण्यात आली. यात एका 24 वर्षांच्या तरुणाचाही समावेश आहे. सोबतच एका 40 वर्षीय महिलेचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

6 बळींची विस्तृत माहिती

राज्यातील कोरोना बळींची चिंता कायमच आहे. कोरोनाचा मृत्यूदर मे महिन्यात जो वाढला होता, तो कमी कधी होणार, याची चिंता संपूर्ण राज्याला सतावते आहे. रविवारी झालेल्या 6 मृत्यूंमुळे राज्यातील एकूण कोरोना बळींची आकडा हा आता 3 हजार 132 इतका झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. रुग्णवाढ जरी नियंत्रणात येत असली, तरिही गाफील होणं धोकादायक ठरु शकतं, हे पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झालंय. दरम्यान, ज्या 6 पैकी 5 जण हे जीएमसीत दगावले असून दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : कर्फ्यू पुन्हा 7 दिवसांनी वाढवला! नियम जैसे थेच… वाढीव शिथिलता नाही

ज्या 24 वर्षांच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्याच्यावर 28 दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. तर 40 वर्षीय महिलेवर जीएमसीत 4 दिवस उपचार सुरु होते. 21 जूनला 24 वर्षांचा तरुण कोविड पॉझिटिव्ह झाल्याची नोंद करण्यात आली होती. महिनाभर या तरुणावर उपचार सुरु होते. महिन्याभराच्या उपचारानंतर अखेर या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं शोककळा पसरली आहे. हा तरुण वाळपईतील राहणारा होता. तर 40 वर्षीय महिला ही मडगावातील असून तिच्या मृत्यूनंही दुःख व्यक्त केलं जातंय.

कर्फ्यू वाढवलाय, पण उपयोग काय?

एकीकडे राज्यातील कर्फ्यू वाढ करण्यात आली आहे. नियम जरी तेच ठेवण्यात आले असले तरिही राज्यव्यापी कर्फ्यू आता पहिल्यासारखा कडक राहिलेला नाही. मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा पुन्हा वाजायला सुरुवात झालेली आहेच. कर्फ्यू फक्त नावाला असल्यासारखे लोक वावरु लागले आहेत. अशात पुन्हा एकदा लोकं बेफिकीरपणे आणि बेजबाबदारपणे वागत असून आताच जर काळजी घेतली गेली नाही, तर तिसरी लाट फार लांब नाही, असाही दावा केला जातोय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये रविवारी पुन्हा 7 दिवसांची वाढ केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मात्र या कर्फ्यूत वाढ केल्याचा खरंच काही उपयोग होणार आहे का, यावरुनही सवाल उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेलाही वेग येण्याची आणखी गरज व्यक्त होतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!