करोनाचा कहर! पुन्हा एकदा देशभरात 1 हजारपेक्षा जास्त मृत्यू

85 हजारपेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर, एक हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णसंख्येची वाढ काही केल्या आवाक्यात येताना दिसत नाही आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये तब्बल 85 हजारपेक्षा जास्त रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. तर एकूण एक हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय.

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात एकूण 85 हजार 362 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढतो आहे. पुन्हा एकदा देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 89 रुग्ण दगावलेत. सध्या देशाची एकूण रुग्णसंख्या 59 लाखाच्या पुढे गेली आहे. एकूण रुग्णसंख्या भारताची आता 59 लाख 3 हजार 933 इतकी झाली आहे. सध्या देशात 9 लाख 60 हजार 969 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

महत्त्वाचं म्हणजे यातील अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे ते लवकरात लवकर बरे होतील, असाही विश्वास व्यक्त केला जातो आहे. आतापर्यंत एकूण 48 लाख 49 हजार 585 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी दिली आहे.

मात्र चिंताजनक बाब म्हणजे एकूण रुग्णांच्या तुलनेत जरी मृत्यूदर कमी असला, तरी दिवसेंदिवस मृत्यू होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरतेय. आतापर्यंत देशात एकूण 93 हजार 379 रुग्ण दगावले आहेत. अद्यापही काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. लवकरच हा आकडा एक लाखाचा टप्पा गाठेल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहनही वेळोवेळी करण्यात येतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!