भाजपच्या वैद्यकीय विभागाने सवंग प्रसिद्धी थांबवावी!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यातील जनता कोविड संकटाने त्रस्त आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे लोकांचे जीव जात असताना भाजपचा वैद्यकिय विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांचे फोटो असलेले पोस्टर समाजमाध्यमावर प्रसारित करुन सवंग प्रसिद्धी मिळवण्यात व्यग्र आहे. वैयक्तिक प्रसिद्धी करुन घेण्याची हौस असलेल्या या विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी जाहिरातबाजी बंद करुन रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

आज रुग्णांना वेळेत प्राणवायू, औषधे, खाटा व लसी मिळणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर भाजप नेत्यांचे फोटो पाहण्यात कुणालाच रस नाही. आज आपली वैद्यकशास्त्राची लोकांना सेवा देण्याची जबाबदारी सोडून डॉ. शेखर साळकर जाहिरातबाजी करण्यात व्यग्र आहेत, हे धक्कादायक व दुर्देवी आहे, असे चोडणकर म्हणालेत.

गोव्यात 18 ते 45 वर्षांच्या लोकांना 1 मे पासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय सरकारने लस उपलब्ध नसल्याने ऐनवेळी रद्द केला. केंद्र व अनेक राज्य सरकारे आज लस उपलब्ध करुन घेण्यास धडपडत आहेत. परंतु गोव्यातील एका खासगी इस्पितळाने लसीकरण चालू केले आहे. डॉ. शेखर साळकर यांनी सदर खासगी इस्पितळाला लसी कशा मिळाल्या, हे भाजपचे वैद्यकीय विभागाचे प्रमुख या नात्याने जनतेला स्पष्ट करावे, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

राजकीयदृष्ट्या प्रेरित डॉ. शेखर साळकर यांनी भाजपची तळी उचलून धरण्याची एकही संधी सोडली नाही. चाचणी न करता सामाजिक सर्वेक्षण करणे, खासगी इस्पितळांतील खाटा कोविड रूग्णांसाठी राखीव करणे अशा सरकारच्या चुकीच्या निर्णयांना साळकरांनी उघड पाठिंबा दिला. परंतु सदर निर्णयांचा काहीच फायदा झाला नाही, हे आता उघड झाले आहे, असे चोडणकर म्हणाले.

भाजपच्या वैद्यकीय विभागाशी संलग्न किती डॉक्टर आज प्रत्यक्ष कोविड रुग्णांना मदत करीत आहेत, हे डॉ. साळकरांनी लोकांना सांगावे. गोव्यात आज ऑक्सिजन, कोविड औषधे, खाटा यांचा किती साठा उपलब्ध आहे, याची माहिती जनतेला द्यावी, असे चोडणकर म्हणाले.

भाजप वैद्यकीय विभागाने खासगी इस्पितळात लसीकरण करुन घेण्यासाठी लोकांना सवलतीच्या दरात लस उपलब्ध करुन देण्याची मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!