कोविडचं गैरव्यवस्थापन गोवेकरांच्या जीवावर!

'आप'ची टीका : चाचणी प्रमाण आणि हॉस्पिटलमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यातूनच मिळू शकेल कोविडशी लढण्याचा मार्ग. कोविड ऍम्ब्युलन्सची संख्या न वाढविल्याने चिंता.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात कोविडबधितांच्या मृत्यूंपैकी 95 टक्के मृत्यू हे व्याधींनी आजारी असलेल्या रुग्णांचे होतात, तर 5 टक्के मृत्यू हे इस्पितळात उशिरा आल्यामुळे होतात, या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विधानाचा समाचार ‘आप’ने घेतला आहे. निष्पाप गोवेकरांना दोष देऊन मुख्यमंत्री आपल्या सरकारच्या अपयशावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करू पहात आहेत, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुरेल तिळवे (Surel Tilve) यांनी केली आहे.

तिळवे म्हणाले, रुग्णांना नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स नसतील, तर गरीब रुग्ण हॉस्पिटलमध्ये वेळेत कसे पोहोचतील? लोकांच्या चाचण्या वेळोवेळी होत नसतील, तर ते हॉस्पिटलमध्ये वेळेत भरती कसे होतील? गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर वेळेत पुरविणे तुम्हाला जमत नसेल, तर अशा महागड्या व्हेंटिलेटरचा उपयोग काय? व्हेंटिलेटरचा सर्वात मोठा प्राथमिक उपयोग म्हणजे गंभीर आजारी रुग्णांना जीवनाधार प्रणाली देणे होय. कोविडशी लढण्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित पायाभूत सुविधा आणि यंत्रणाच नाही, हे सत्य जाहीरपणे मान्य करून तुम्ही खरे का बोलत नाही?

सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करा!
सरकारने एक जास्त प्रभावी व सक्षम अशी पारदर्शक प्रणाली गोवेकर जनतेसाठी उभी करणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकांना त्यांच्या भागामध्ये असलेल्या कोविडविषयक सुविधांविषयी माहिती मिळेल. लोकांना त्यांच्या भागात असलेल्या हॉस्पिटल्समध्ये बेड्सची संख्या किती आहे, याची माहिती नाही. दिल्ली सरकारने ही सर्व माहिती एका ऍपच्या आधारे सर्वांना उपलब्ध करून देऊन समस्या सोडविली. गोवा सरकारनेही तातडीने हॉस्पिटल्समधील बेड्सची संख्या प्रत्येक भागाप्रमाणे जाहीर करणे सुरू केले पाहिजे. किमान रोजच्या आरोग्य बुलेटिनमध्ये ही माहिती प्रसिद्ध करून ते लोकांची सोय करू शकतात, असे तिळवे म्हणाले.

कोविड ऍम्ब्युलन्सची संख्या वाढवा!
आरोग्यमंत्र्यांनी 5 जुलै रोजी कोविड ऍम्ब्युलन्स या वैद्यकीय वाहनांची संख्या वाढविणार असल्याची घोषणा करूनही ही संख्या अजूनही वाढविण्यात आली नसल्याने ही बाब चिंता वाढविणारी आहे. या घोषणेला आता 2 महिने होत असून गोव्यातील जनता अजूनही ऍम्ब्युलन्स येण्याची वाट पाहत आहेत. लोकांना तर तब्बल 10 तास वाट पाहावी लागते. गोव्यातील रुग्ण हॉस्पिटल्समध्ये उशिरा पोहोचतात, अशी टीका सावंत करीत होते. आता त्यांच्या भागामध्ये रुग्णांसाठी किती ऍम्ब्युलन्स वाहने उपलब्ध आहेत, याविषयी सावंत यांनी लोकांना स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन तिळवे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचं ‘आप’ला असहकार्य!
आम्ही 2 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री सावंत यांना पत्र पाठविले होते, ज्यामध्ये आम्ही दिल्ली मॉडेलला राबविण्यात आल्यानंतर मिळालेल्या यशाची गाथा या पत्रामध्ये मांडलेली होती. आम्ही गोवा सरकारला उत्कृष्ट तंत्राचा व सेवेचा अनुभव देऊन मदत करण्यास तयार होतो. पण मुख्यमंत्री सावंत यांनी सहकार्य केलं नाही. सध्या गोव्याकडे साधारणतः अंदाजे 1 हजार हॉस्पिटल बेड्स उपलब्ध आहेत. दिल्लीमध्ये सध्याच्या घडीला 15 हजार हॉस्पिटल बेड्स उपलब्ध आहेत आणि प्रत्येक हॉस्पिटलतर्फे आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स यांची उपलब्धता जाहीर करण्यात येते. यामुळे दिल्लीकर आश्वस्त राहत असून कोविडबद्दलची भीती मनातून काढून टाकण्यात त्यांना बरीच मदत व दिलासा मिळत आहे. दुसऱ्या बाजूने गोमंतकीय जनता भीतीखाली वावरत आहे. कारण सरकार बऱ्याच गोष्टी लपवू पाहत आहे, अशी टीका सुरेल तिळवे यांनी केली.

चाचणी दर वाढविणं गरजेचं!
तिळवे म्हणाले, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चाचणी दर वाढविणे होय. धक्कादायक म्हणजे, कोरोनाचा आकडा वाढत असताना चाचण्यांचे प्रमाण प्रति दिवशी 1500 ते 2 हजार इतके मर्यादित राहिले आहे. दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने चाचण्यांची सुविधा 50 हजारहून जास्त चाचण्या प्रतिदिवशी, अशा प्रकारे हे प्रमाण वाढविले आहे. गोव्यातील आमच्या चाचण्यांचा दर आपण किमान 5 हजार चाचण्या प्रतिदिवशी एवढ्यापर्यंत तरी का वाढवू नये? जेणेकरून संशयित रुग्णांना शोधून काढणे आणि वेगळे ठेवणे सोपे होईल आणि विषाणूचा गतीने होणारा प्रसार रोखणे आपल्या आवाक्यात येऊ शकेल. दुर्गम भागामध्ये मोबाईल टेस्टिंग वॅन या वाहनांची सोय करावी. दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांना स्वतःची चाचणी करून घेण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो, जी वस्तूस्थिती आहे.

होम आयसोलेशन किट प्रसिद्धी स्टंट!
होम आयसोलेशन किट लाँच करण्याचा कार्यक्रम प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट होता. जी गोष्ट काही महिन्यांपूर्वी करणे गरजेचे होते, त्यावर पब्लिसिटी स्टंट करून स्वतःचे हसे करून घेण्यात तुम्हाला कसली धन्यता वाटते? घरी क्वारंटाईन करून ठेवण्याच्या होम आयसोलेशन प्रणालीमध्ये कुठल्याही प्रकारचे तारतम्य अथवा व्यवस्था वा प्रोटोकॉल अजिबात नाही. इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेला आपल्या सेवा बंद करणे भाग पडले आणि त्यांनी सूचनांची एक भली मोठी यादीच सरकारला सादर केली आहे. या विषयी मुख्यमंत्री सावंत किंवा आरोयमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. असे का? कोविड व्यवस्थापन गोव्यात पूर्णपणे कोलमडले असल्याचे या गोष्टी सिद्ध करतात, असे सुरेल तिळवे यांनी नमूद केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!