कोविड मृत्यूबद्दल मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर कॉंग्रेसनं केली तक्रार दाखल

तक्रार राजकीय हेतूने नाही तर ती जनहितार्थ ; दिवंगतांच्या कुटुंबांना न्याय देण्यासाठी : चोडणकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कॉंग्रेस पक्षाने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात गैरप्रकार व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविड रुग्णांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरूद्ध आगशी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तक्रारीत म्हटले आहे, की गोमेकॉतील ऑक्सिजनच्या अभावामुळे शेकडो लोकांच्या मृत्यूसाठी डॉ. सावंत आणि राणे हे त्यांच्या बेजबाबदारपणामुळे कारणीभूत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे गोमेकॉत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

चोडणकर यांनी तक्रारीत असे निदर्शनास आणून दिले आहे, की गोमेकॉतील निवासी डॉक्टरांच्या गार्ड या संघटनेने ऑक्सिजनची कमतरता दर्शविली असूनही सरकार उणीवा सुधारण्यास अपयशी ठरले आहे. आता १५ दिवसानंतर शेकडो जणांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाले नाहीत तर अन्य तांत्रिक कारणास्तव झाले आहेत हे भासवण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे.

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचा उतावीळपणा आणि दुर्लक्ष या कारणांमुळे एप्रिल २०२१ पासून आजपर्यंत रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने या रूग्णालयात दाखल झालेल्या शेकडो रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर पुरेसा प्रमाणात नसल्याने तसेच रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांना मृत्यूस सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या बेफिकीरीमुळे रूग्णांना मरण आले असे तक्रारीत म्हटले आहे.

“गोमेकॉतील मृत्यू दररोज सकाळी २ ते पहाटे ६ या दरम्यान घडले आहेत” या आरोग्यमंत्र्यांच्या विधानाचा संदर्भ घेऊन चोडणकर यांनी म्हटले आहे, की या ठराविक वेळेत ऑक्सिजनची कमतरता भासते हे माहित असूनही, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत.

गोव्यातील मोठ्या संख्येने लोक मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे आशेने पहात होते. अशा गंभीर परिस्थितीत ते काहीतरी मार्ग काढतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र सरकार असंवेदनशीलपणे वागले आणि अनेकांना विनाकारण प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या या अक्षम्य कृत्यासाठी त्यांना कठोर शिक्षा व्हावी, “अशी मागणी चोडणकर यांनी केली.

माध्यमांशी बोलताना चोडणकर म्हणाले की, ही तक्रार राजकीय हेतूने नाही तर ती जनहितार्थ केली आहे. आम्हाला मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या चुकांमुळे प्राण गमवावे लागणाऱ्या निरपराध लोकांसाठी संघर्ष करायचा आहे आणि आम्हाला दिवंगतांच्या कुटुंबांना न्याय द्यायचा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!