कोविडप्रश्नी सरकारची बोलाचीच कढी बोलाचाच भात!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : खाटांची व्यवस्था करणे, चाचण्या करणे, यापासून ते ऑक्सिमीटर किट्स उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळे काही बोलाचीच कढी, बोलाचाच भात, असा फक्त बोलून दाखवण्याचाच तमाशा झालेला आहे. वादळ अजून शमलेले नाही. तेव्हा विश्वजीत राणे यांनी खोटी आश्वासने बंद करावे, असा इशारा आम आदमी पक्षाचे प्रवक्ता राहुल म्हांबरे (Rahul Mhambrey) यांनी दिला आहे.
म्हांबरे म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे, पण चाचण्यांच्या संख्येत मात्र वाढ झालेली नाही. 26 जुलै ते 19 सप्टेंबर या काळामध्ये दर आठवड्याचे निरीक्षण आम्ही केले असता असे स्पष्टपणे दिसून येते की चाचण्यांची सर्वसाधारण संख्या तेवढीच राहिलेली आहे, पण कोविड रुग्णांची संख्या 2.5 पटीने दर दिवशी वाढत गेलेली आहे. म्हणजे पॉझिटिव्ह होणार्यांचा दर वेगाने वाढत गेलेला आहे.
दररोज किमान 5 हजार चाचण्या करा!
केवळ 8 आठवड्यांच्या काळामध्ये करोनाची रुग्णसंख्या 3 पटीने वाढत गेलेली असून 1 हजार 652 रुग्णांपासून 5 हजार 408 पर्यंत गेली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात करोनामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूचा दर चारपट जास्त आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 15 मृत्यूची नोंदणी होती. पण 19 सप्टेंबरला अर्ध्या संपलेल्या महिन्यामध्ये 56 मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यासाठीच आम्ही मागणी करीत आहोत की दैनंदिन स्तरावर 5 हजार चाचण्या कराव्यात जेणेकरून ज्यांच्यामुळे कोविड रुग्णांना वेळेत शोधणे सोपे होईल आणि महामारीला नियंत्रणात आणून थोपवणे शक्य होईल, असे मत म्हांबरे यांनी व्यक्त केले.
आप आणि सर्वसामान्य गोवेकर आतापर्यंत 40 हजार घरांपर्यंत ‘गोवन्स अगेन्स्ट करोना’ मेच्या आधारे पोहोचू शकतात आणि ऑक्सिजन स्तर तपासण्याचे काम करू शकतात, तर आपण राणे यांना विचारू इच्छितो की तुम्ही आतापर्यंत आश्वासन दिलेले घरी क्वारंटाईन केल्यावर देण्यात येणारे ऑक्सिमीटर किट्स आतापर्यंत का देण्यात आलेले नाहीत? सर्वसामान्य गोवेकरांच्या जिवाशी खेळ का केला जात आहे? खोटी आश्वासने देणे बंद करा आणि दिलेले शब्द पाळा आणि कृती करा, असे आपचे नेते राहुल म्हांबरे यांनी म्हटले आहे.
आम्ही प्रस्तावित केलेल्या 3 टी मॉडेलविषयी मुख्यमंत्री सावंत यांना तक्रार असू शकेल. कालच पंतप्रधान मोदीजी यांनी चाचणी आणि नवे रुग्ण शोधून काढणे यासाठी आदेश दिलेले आहेत. मोदीजी जर हे समजू शकतात तर सावंत यांना त्यापासून काय अडचण आहे? दिवसाकाठी चाचणी 5 हजारांपर्यंत करावी असा आदेश ते राणे यांना का देऊ शकत नाहीत, असा सवाल म्हांबरे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी एक धूर्तपणे चाल खेळताना खाजगी हॉस्पिटल्समधील कोविड उपचारासाठीच्या भरमसाठ आणि वाढीव किमतीमध्ये काटछाट केल्याचे जाहीर केले. लोकांवर आपले स्वतःचे नियम लादून खाजगी हॉस्पिटल्स फक्त पैसे कमविण्यात गुंतलेली आहेत. लोकांनी त्याचे व्हिडिओ अथवा ध्वनिचित्रमुद्रण करून समज माध्यमांवर घातलेले आहे की कसे खाजगी हॉस्पिटल्स रुग्णांना जबरदस्तीने 7 दिवस राहण्यास भाग पाडत आहेत. खोलीचे भाडे एका दिवसासाठी तब्बल 25 हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधी २ लाख रुपये अॅडव्हान्स देण्याची सक्ती केली जात आहे. हे सगळे काही सरकारच्या नाकावर टिच्चून केले जात असून या खंडणीविरुद्ध काहीही कारवाई मात्र नाही, असेही म्हांबरे यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे सरकार हॉटेल्स आणि खाजगी हॉस्पिटल्सचा ताबा घेऊ शकते. पायाभूत सुविधांविषयीच्या समस्यांना हाताळण्यासाठी विविध राज्यांनी या पर्यायाचा वापर केलेला आहे. पण गोव्यात मात्र असे काहीही करण्यात आलेले नाही. हॉटेल्स आणि खाजगी हॉस्पिटल्स यांना ताब्यात घेऊन त्यांचे रूपांतर कोविड केंद्रात करण्यापासून सरकारला कोण रोखत आहे?
गोमेकॉ पुन्हा एकदा रुग्णांनी भरली असून 1600 रुग्णसंख्येनेपासून 5800 एवढ्या प्रचंड आकड्यावर पोहोचलेली आहे. तेही केवळ 2 महिन्यांच्या काळात. मला राणेंना सांगायचे आहे की वादळ अजून संपलेले नाही. गोवेकरांना मूर्ख बनविणे बंद करा आणि काही तरी प्रभावी उपाययोजना करा ज्याचा गोवेकर जनतेला काही फायदा होईल.
– राहुल म्हांबरे, प्रवक्ता, आप गोवा प्रदेश
बेड्सची उपलब्धता रोजच्या रोज जाहीर करा!
सरकारने हॉस्पिटल्समधील बेड्सची उपलब्धता रोजच्या बुलेटिनद्वारे जाहीर करावी आणि गोवेकर जनतेच्या भल्यासाठी काम करणे सुरू करावे, अशी मागणी आपने केली आहे. सरकार करोनाशी उपचार देण्यासंदर्भात गंभीर असेल तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभ ते करोना उपचारांशी का जोडत नाही? गोवेकरांच्या खिशांवरील भार कमी करण्यासाठी हा सर्वांत चांगला उपाय ठरू शकेल, असेही आम आदमी पक्षाने म्हटले आहे.