कोरोना संकटातही नवी ‘पीएचसी’ का बंद?

कासांवली सरपंच फुर्तादो यांचा आमदार साल्दाना यांना सवाल

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

पणजी : गंभीर कोविड परिस्थितीत खाटा व इतर पायाभूत सुविधांची कमतरता असूनही नवीन कासांवली प्राथमिक आरोग्य केंद्र अद्याप का उघडले नाही? असा सवाल कासांवली सरपंच जुझे मारिया फुर्तादो यांनी आमदार एलिना साल्दाना यांना केलाय. लॉकडाऊन लागू करण्यासाठी पंचायतीत आयोजित सर्वसाधारण सभेनंतर फुर्तादो पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, एक सरपंच म्हणून आमदार एलिना साल्दाना यांना हे विचारतो आहे की लोक बेड व इतर सुविधा मिळविण्यासाठी धडपडत आहेत. तरी सुद्धा नवीन बांधले गेलेले कासांवली प्राथमिक आरोग्य केंद्र अद्याप का उघडले नाही? आपण सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहिले आहे लसीकरणासाठी आणि चाचणीसाठी आलेल्या लोकांची गर्दी यामुळं परिस्थिती बिघडत चाललीय. पीएचसीनं देखील ओपीडी थांबविली आहे. लोक अडचणीत आहेत. माझ्या लोकांच्या वतीनं मला एक स्पष्ट संदेश एलिना साल्दाना यांना पाठवायचा आहे की, त्यांनी लोकांना होणारा त्रास पहावा. उद्घाटनाची तारीख आता लोकांना नको आहे. त्यांना रुग्णालयाची आवश्यकता आहे. नव्यानं बांधलं गेलेलं रुग्णालय वेळीच उघडलं गेलं नाही, ही खेदाची बाब आहे. कासांवलीमध्ये बरीच जागा आहे, जसे की कासावली स्टेडियम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विशाल हॉल आहे, ज्याचा उपयोग मिनी हॉस्पिटल म्हणून केला जाऊ शकतो. मोठ्या संख्येनं दुकानं लसीकरणासाठी वापरता येतील. राज्यातील कोविडचा सध्याचा विस्तार पाहता लोकांसाठी नव्यानं तयार केलेली प्राथमिक आरोग्य केंद्र उघडा, असं फुर्तादो म्हणाले. उपसरपंच रत्नदीप नाईक म्हणाले की, कोविडमधून नुकतेच बरे झालेल्या लोकांनी आरोग्य किटमधील ऑक्सिमीटर आणि इतर वस्तू पीएचसीकडं परत कराव्यात. पॉझिटिव्ह चाचणी घेतल्यानंतर बर्‍याच लोकांना हेल्थ किट देण्यात आली. ऑक्सिमीटर प्राथमिक आरोग्य केंद्रात परत देण्यासाठी मी आवाहन करतो. ते इतरांना उपयोगी ठरेल, असं नाईक म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!