कोर्ट अपडेट : अन्वर शेख हल्लाप्रकरणी तानावडेला सशर्त जामीन

रेव्ह पार्टीदरम्यान अटक केलेल्यांच्या जामीनावर आज सुनावणी

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : कुख्यात गुंड अन्वर शेख याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पाच संशयितापैकी संशयित विजय कारबोटकर, सुधन डिकॉस्टा, महेंद्र तानावडे या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. यातील महेंद्र तानावडे या संशयिताला खंडपीठाने २५ हजार रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला. तर इतर दोघांनी खंडपीठात दाखल केलेले अर्ज मागे घेतले आहे.

गुंड अन्वर शेख याच्यावर १६ फेब्रुवारी रोजी भरदुपारी फातोर्डा आर्लेम सर्कलनजीक खुनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात रिकी होर्णेकर, विपुल पट्टारी यांच्यानंतर इम्रान बेपारी, विजय कारबोटकर, हर्षवर्धन सावळ, सुधन डिकॉस्टा व महेंद्र तानावडे या संशयितांना कोल्हापूर येथून फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती. अन्वर शेख हल्लाप्रकरणी मडगावातील प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील संशयित विजय कारबोटकर, सुधन डिकॉस्टा, महेंद्र तानावडे या तिघांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला.

यातील महेंद्र तानावडे या संशयिताला खंडपीठाने २५ हजार रुपये, २२ ते २७ रोजी दरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी १२ वाजता पोलिस स्थानकावर हजेरी लावण्याचा व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला. तर इतर दोघांनी खंडपीठात दाखल केलेले अर्ज मागे घेतले आहे.

रेव्हा पार्टीदरम्यान अटक केलेल्यांचा जामीनासाठी अर्ज

मुंबई नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील क्राईम ब्रँचच्या सहकार्याने शुक्रवार, १२ मार्च रोजी मध्यरात्री वंझरांत – वागातोर येथील शिवा प्लेस रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेली रेव्ह पार्टीवर उधळून लावली होती. या वेळी एका विदेशीसह दोघा गोमंतकीयांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या संशयित अजिंक्य कालेकर, जोएल मेंडोसा आणि केनी मार्को फ्रिस्चेनेच या संशयितांनी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार आहे.

आज सुनावणी

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने गुप्तहेरांच्या दिलेल्या माहितीवरून प्रथम शुक्रवारी १२ मार्च रोजी मध्यरात्री लारीव बिच रिझोर्ट जवळच्या पार्किंग परिसरात अमली पदार्थ तस्करी प्रकरणी छापा टाकून एका केरळ युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर त्या संशयितांच्या माहितीवरून एनसीबीने मंकी बार अॅन्ड रेस्टाॅरंट मध्ये छापा घालून आणखीन एका केरळ युवकाला ताब्यात घेतला. याच दरम्यान वंझरांत – वागातोर येथील शिवा प्लेस रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेली रेव्ह पार्टीवर उधळून लावत संशयित अजिंक्य कालेकर, जोएल मेंडोसा आणि केनी मार्को फ्रिस्चेनेच या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्यांकडून लाखो रुपये किमतीचे चरस, गांजा, हेरॉईन, एलएसडी, एमडीएमए यांसारखे अमली पदार्थ जप्त केले. या सर्व संशयितांना म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने रविवारी १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली. दरम्यान या संशयितांनी मंगळवारी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान या प्रकरणी एनसीबीने शिवा प्लेस रेस्टॉरंटचे आनंद आगरवाडेकर याची मंगळवारी पुन्हा चौकशी करून त्याच्याकडून आयोजित पार्टीच्या संदर्भात परवानगी बाबत दस्तावेज घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!