अंतर्गत संघर्ष उफाळल्यानं भाजपसमोर पेच

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीत बंडाचे झेंडे

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपनं बाजी मारली खरी, पण आता भाजपातला अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदावरून काणकोणमध्ये उभी फूट पडलीय, तर कुडचडे काकोडाच्या नगराध्यक्षपदासाठी दोघांचे अर्ज आल्यानं स्थानिक पक्ष नेतृत्वासमोर पेच निर्माण झालाय.

काणकोणमध्ये उभी फूट

काणकोणमध्ये 12 पैकी 12 जागा जिंकून भाजप पुरस्कृत पॅनलनं विरोधकांची धूळदाण उडवली. आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी एकहाती विजय खेचून आणला. मात्र प्रत्यक्षात नगराध्यक्ष निवडीवेळी भाजपमधील संघर्ष चव्हाट्यावर आलाय. नगराध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन गट पडलेत. नगरसेवकांमध्ये उभी फूट पडल्यानं आमदार इजिदोर फर्नांडिस यांची डोकेदुखी वाढलीय. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. एका गटाकडून सायमन रिबेलो आणि अमिता पागी, तर दुसर्‍या गटाकडून धीरज नाईक गावकर आणि सुप्रिया देसाई यांचे अर्ज दाखल झालेत. त्यामुळे यापैकी कोणाच्या बाजूने पक्षाचा कौल लागतो, याकडे लक्ष लागलंय. अडिच-अडिच वर्षांच्या अलिखित कराराचा पॅटर्नही अमलात येण्याची शक्यता आहे.

कुडचडे-काकोडातही चुरस

काणकोणप्रमाणेच कुडचडे-काकोडा नगरपालिकेच्या भाजप गटात फूट पडल्याची चर्चा आहे. नगराध्यक्षपदासाठी दोघांनी अर्ज दाखल केलेत. बाळकृष्ण होडारकर आणि विश्वास सावंत यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानं स्थानिक आमदार तथा वीजमंत्री नीलेश काब्राल यांची डोकेदुखी वाढलीय. चुरसपूर्ण लढतीत काठावरचं बहुमत मिळवून भाजप पॅनलनं कुडचडे-काकोडा नगरपालिकेवर दावा केला. मात्र अंतर्गत संघर्षाचं गालबोट लागल्यानं पालिकेची हातची सत्ता भाजपकडून निसटते की काय, अशी शक्यता निर्माण झालीय. सध्या तरी दोन्ही नगरसेवक अर्ज मागे न घेण्यावर ठाम आहेत. त्यांची मनधरणी पक्ष नेतृत्व कशी करतं, याकडे लक्ष लागलंय.

डिचोलीत बिनविरोध निवड

डिचोली नगराध्यक्षपदी कुंदन फळारी यांची, तर उपनगराध्यक्षपदी तनुजा गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला होता. या संदर्भात गुरुवारी अधिकृत घोषणा होणार आहे. डिचोलीत भाजपनं विरोधकांच्या व्यूहरचनेला मात देत सत्ता हस्तगत केली होती. आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर आणि डिचोलीचे प्रभारी तथा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांचा करिश्मा यामुळे डिचोलीतील चुरसपूर्ण लढतीत भाजप पॅनलनं बाजी मारली.

यापूर्वी कुंकळ्ळी, वाळपई आणि पेडणे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची निवड बिनविरोध झाली. पणजी महापालिकेच्या महापौर-उपमहापौरांची निवडही बिनविरोध झालीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!