सरकारी खात्यांत भ्रष्टाचाराचा बाजार

दीड वर्षांत फक्त २०८ तक्रारी

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : सरकारी खात्यांत भ्रष्टाचाराचा बोकाळला आहे. कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही, हा नागरिकांचा अनुभव आहे. सरकारी खात्याची ही कीड आता अन्यत्र पसरू लागली आहे. भ्रष्टाचारामुळे बहुतेक जण पिचलेला असतानाही त्याविरोधात तक्रारी करण्यासाठी मात्र मोजकेच लोक पुढे येतात, हे दक्षता खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ एप्रिल २०१९ ते २५ नोव्हेंबर २०२० या काळात २०८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. १० गुन्हे नोंदवले असून दोन प्रकरणांत प्राथमिक चौकशी सुरू आहे.

प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावल्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने ९ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवस म्हणून निश्चित केला आहे. आपल्या देशात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ लागू आहे. या कायद्यानुसार भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई केली जाते. राज्यात भ्रष्टाचार विरोधी पथकात (एसीबी) १ एप्रिल २०१९ ते २५ नोव्हेंबर २०२० या काळात २०८ तक्रारी दाखल आहेत. यांतील ९३ तक्रारींवर कारवाई सुरू असून ११५ तक्रारी प्राथमिक चौकशी करून सबंधित दोषींना दंड वा इतर शिक्षा सुनावून निकालात काढण्यात आल्या आहेत. वरील कालावधीपूर्वी प्रलंबित असलेल्या ८५ तक्रारी निकालात काढल्या आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत एसीबीने १० गुन्हे दाखल केले आहेत. मागील काळातील ७ प्रकरणांत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ७ प्रकरणांत न्यायालयात अंतिम अहवाल दाखल आहेत. याशिवाय एसीबीने वरील कालावधीत दोन प्रकरणांत सरकारी अधिकार्‍यांवर प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. मागील वर्षाच्या दोन प्राथमिक चौकशी निकालांत काढल्याची माहिती आहे.

वर्षभरात फक्त १३ अधिकार्‍यांवर आरोपपत्र

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दक्षता खात्यात सुरू असलेल्या तक्रारीची माहिती घेतली असता, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळात सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या विरोधातील सुमारे ४०० तक्रारी प्राथमिक चौकशीत तथ्य न आढळल्यामुळे निकालात काढल्या आहेत. ३५ तक्रारी अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून निकालात काढल्या. १३ अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यांच्या विरोधात पुढील कारवाई सुरू आहे. २४ अधिकार्‍यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!