कोरोनाचा पलटवार : गेल्या 24 तासात दिवसभरातल्या सर्वाधिक मृत्युंची नोंद !

गोव्यासह 15 राज्यांचा पॉझिटिव्हिटी रेटही चिंताजनक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असतानाच गेल्या 24 तासातली आकडेवारी मात्र काळजी वाढवणारी आहे. देशात गेल्या 24 तासात एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 6,148 मृत्युंची नोंद झालीय. बाधितांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालीय. गोव्यासह 15 राज्यांचा पॉझिटिव्हिटी रेटही चिंताजनक आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या बदलाचं आव्हान सध्या आरोग्य मंत्रालयासमोर आहे.

देशात कोरोनाच्या दुस-या लाटेचा कहर सुरूच आहे. ही लाट ओसरत असतानाच आता पुन्हा चिंताजनक आकडेवारी समोर आलीय. देशात गेल्या 24 तासात झालेल्या कोविड मृत्यूंची संख्या ही एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे. दैनंदिन बाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार,देशात गेल्या 24 तासात एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 6,148 करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. त्यामुळं आता मृतांचा आकडा तीन लाख 59 हजार 676 झालाय.

गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र , आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता 1.23 टक्क्यांवर पोहोचला आहे. दैनंदिन बाधितांच्या संख्येतही वाढ झाल्याचं स्पष्ट होतंय. काल दिवसभरात देशात 94 हजार 52 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालीय. त्यामुळं सध्या उपचाराधीन असलेल्या रूग्णांचा आकडा आता 11 लाख 67 हजार 952 वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात देशातले एक लाख 51 हजार 367 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

दरम्यान, देशात काल दिवसभरात 33 लाख 79 हजार 261 नागरिकांनी लस घेतली. त्यामुळं लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता 24 कोटी 27 लाख 26 हजार 693 वर पोहोचली आहे. देशात कमी होणा-या रुग्णसंख्येदरम्यानच पॉझिटिव्हिटी रेटनं चिंता वाढवलीय. सध्या देशातील 15 राज्यातील संक्रमण दर 5 टक्केपेक्षा जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितल्यानुसार, 5 टक्केपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असेल तर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हणता येत नाही. सध्या गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रासह 15 राज्यांचा संक्रमण दर 5 टक्केपेक्षा जास्त आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!