कोरोना ? छे…साधं सर्दी-पडसं ; ‘या’ देशात आता नवे नियम !

क्वारंटाइन धोरण रद्द, मोठे कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय प्रवासालाही परवानगी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : “जवळपास मागील १८ महिन्यांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातील देश कोरोना महासाथीचा सामना करत आहेत. ही साथ कधी आणि कशी थांबणार? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. काही तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार कोरोना कधीच नष्ट होणार नाही. ही जरी थोडी वाईट बातमी असली तरी दुसरीकडे चांगली बातमी ही आहे की आपल्याला कोरोनासोबत जगता येईल..” हे शब्द आहेत सिंगापूरचे व्यापार मंत्री गान किम योंग, अर्थमंत्री लॉरेन्स वोंग आणि आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी स्ट्रेट्स टाइम्ससाठी लिहिलेल्या संपादकीय लेखामधील. या संपादकीय लेखाची सध्या जगभरामध्ये चर्चा आहे. या लेखाची जगभरामध्ये दखल घेण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत कोरोनाशी अगदी सक्षमपणे दोन हात करणाऱ्या सिंगापूरने आपली कोरोना संदर्भातील धोरणं बदलली आहेत. सिंगापूर सरकार आता कोरोनाला एखाद्या सामान्य तापाप्रमाणे किंवा सर्दी-खोकल्याच्या आजाराप्रमाणे समजून त्यावर उपचार करणार आहे.

२३ जानेवारी २०२० रोजी सिंगापूरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिलपर्यंत देशात रोज ६०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. ऑगस्ट २०२० मध्ये कोरोनाची एक छोटी लाट येऊन गेल्यानंतर देशात फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही आणि रुग्णसंख्याही वाढली नाही. अर्थात ५७ लाख लोकसंख्या असणाऱ्या सिंगापूरमध्ये रोज २० ते ३० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या अवघी ३६ इतकी आहे.

कोरोना मृतांच्या संख्येवरुनच सिंगापूर हा जगामध्ये कोरोनाविरुद्धचा लढा सक्षमपणे आणि प्रभावी मार्गाने लढणाऱ्या देशांच्या यादीत आघाडीच्या देशांपैकी एक आहे, हे स्पष्ट होतंय. सिंगापूरमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाते. त्याला हॉटेल क्वारंटाइन, होम आयसोलेशनसारख्या नियमांचं पालन करावं लागतं. मात्र असं असलं तरी आता सिंगापूरने कोरोनासोबत जगण्याच्या दिशेने धोरणात्मक बदल करत पहिलं पाऊल टाकलं आहे.

सिंगापूरने कोव्हिड १९ मल्टी मिनिस्ट्री टास्क फोर्स तयार केलाय. म्हणजेच अनेक मंत्रालयांचे प्रमुख मंत्री या टास्क फोर्समध्ये असून त्यांनीच या धोरणांसंदर्भात निर्णय घेतलाय. या टास्क फोर्समधील मंत्र्यांनीच लिहिलेल्या या लेखात, दरवर्षी अनेकांना फ्लू होतो. या रुग्णांपैकी खूप मोठ्या प्रमाणातील रुग्ण हे रुग्णालयात दाखल न होताच ठणठणीत बरे होतात, असं म्हटलं आहे. आपण या आजाराला संपूर्णपणे संपवू शकत नाही. मात्र या धोकादायक आजाराला आपण इन्फुएन्झा आणि गोवर, कांजण्यांसारख्या सामान्य आजारांप्रमाणे समजून त्यावर उपचार करु शकतो. आता आपल्याला या आजारासोबत जगण्याची सवय लावली पाहिजे, असंही या लेखात म्हटलं आहे.

काय आहे सिंगापूरचं नवं धोरण..

  • झिरो ट्रान्समिशन धोरण रद्द केलं
  • प्रवाशांसाठी असणारं क्वारंटाइन धोरण रद्द करण्यात आलं.
  • संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेट करणार नाही.
  • कोरोनाबाधितांची आकडेवारी रोज जाहीर केली जाणार नाही.
  • प्रकृती चिंताजनक असणाऱ्यांचीच विशेष काळजी घेतली जाणार
  • मोठे कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी देण्यात येणार
  • ऑगस्टपर्यंत देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण करणार.

(माहिती सौजन्य : स्टॅटिस टाइम्स)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!