बरोबर ८ महिन्यानंतर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी एकही कोरोना बळी नाही!

गोव्याच्या आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारी आकडेवारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारचा दिवस कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक दिवस ठरलाय. राज्यात तब्बल आठ महिन्यांनंतर कोविडमुळे एकाही रुग्णाचा 24 तासांच्या कालावधीत मृत्यू झालेला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 12 नोव्हेंबरला एकाही कोविडबाधिताचा मृत्यू झाला नव्हता. योगायोग म्हणजे आजही १२ तारीखच असून तब्बल ८ महिन्यांनंतर पुन्हा एकदा एकाही मृत्यू नोंद न झाल्याचं आरोग्य खात्यानं दिलेल्या आकडेवारीतून समोर आलंय. राज्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.

काय आहे आकडेवारी?

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोविडबाधितांच्या बळींची संख्याही नियंत्रणात येतेय. रविवार ते सोमवारच्या 24 तासांच्या काळात एकाही कोविड बळीची नोंद राज्यात झाली नाही. यापूर्वी 12 नोव्हेंबरला एकाही कोविडबाधिताचा मृत्यू झाला नव्हता. म्हणजेच तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर 24 तासांच्या कालावधीत एकाही कोविडबाधिताचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत राज्यात एकूण 3 हजार 97 जणांचा कोविडमुळे मृत्यू झालाय. राज्यात नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाणही कमी होतंय. सोमवारी 108 नवे रुग्ण आढळून आले, तर 186जण कोरोनातून बरे झाले. राज्यात सध्याच्या घडीला 1 हजार 770 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोनातून बरे होण्याचा म्हणजेच रिकव्हरी रेट 97.12 टक्क्यांवर इतका समाधानकारक आहे.

हेही वाचा : मे महिन्यात गोव्यात कोरोना मृत्यूचं तांडव! एका महिन्यात 1 हजार 400 पेक्षा जास्त मृत्यू

ढिलाईत वाढ

एकीकडे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या घटत असली तरिही सरकारकडून खबरदारीची पावलं उचरल १९ जुलैपर्यंत कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात सरकारनं दिलासाही दिलाय. आता दुकानं १२ तास उघडी राहणार आहेत. तर दुसरीकडे व्यायामशाळा आणि स्पोर्ट्स् कॉम्प्लेक्ससह धार्मिक स्थळांनाही अल्पसा दिलासा देण्यात आला आहे. हळूहळू राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानेही सरकारला अंतरिम दिलासा दिलाय.

हेही वाचा : आगडोंब | कोलवाळमध्ये भीषण अग्नितांडव थोडक्यात अनर्थ टळला

अन्य दिलासे

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आता राज्यात प्रवेश दिला जावा, असं हायकोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आता गोव्यात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणीऐवजी कोरोना लसीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणाचं ध्येय गाठण्यासाठीही सरकारनं कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी जारी करण्यात आलेले आकडे, हे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करत असल्याचंच अधोरेखित करत आहेत.

हेही वाचा : भरपूर ढिलाई आणि कर्फ्यूत वाढ! हीच तिसऱ्या लाटेसाठी अनुकूल स्थिती?

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!