CORONA UPDATE | बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण वाढले

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः राज्यात नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण पुन्हा एकदा 100 च्या बाहेर जाऊन पोहोचलंय. बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण वाढले असल्यानं पुन्हा एकदा चिंता वाढलीये. तर मृत्यूदराची डोकेदुखीही कायम आहे. गुरुवारी कोविडमुळे तिघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नाही म्हटलं तरी चिंता आहेच. राज्याचा रिकव्हरी रेट स्थिर असल्याचं राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिनमधून समोर आलंय.
गुरुवारची कोविड आकडेवारी
राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार गुरुवारी राज्यात 102 नवे कोरोनाबाधित सापडलेत. गुरुवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 29 झालीये. मागच्या 24 तासांत 5 हजार 932 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे. गुरुवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 17 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 85 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.
रिकव्हरी रेट स्थिर
मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट स्थीर आहे. त्यात किंचित चढ-उतार होतायत. सोमवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.56 टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 88 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 11 जण पूर्णपणे बरे झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.