४५ वर्षांवरील व्यक्तींचे आजपासून लसीकरण, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर

पार्ट्या, उत्सवांचा फटका; सक्रिय बाधित दीड हजारांवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशासह राज्यात गुरुवारपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविड लस देण्यात येणार आहे. ३७ सरकारी हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्रात तसेच २५ खासगी हॉस्पिटलमध्ये लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात सध्या ७४ हजार डोस उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार आणखी लस उपलब्ध केली जाईल, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.

प्रतिदिन १५० पर्यंत लस देण्याची व्यवस्था सरकारी केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. आधार कार्डसह केंद्रात येऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर लस दिली जाईल. केंद्रात लस आणि कर्मचारी किती आहेत यावर लसीकरणाचा आकडा अवलंबून आहे. एका केंद्रात प्रतिदिन १०० जणांना लस पुरेशी झाल्यास दुस ऱ्या केंद्रात शंभरहून अधिक लस देता येणे शक्य होईल. खासगी हॉस्पिटलांची स्वतंत्र व्यवस्था असेल. खासगी हॉस्पिटलांत लस घेण्यासाठी जाण्यापूर्वी नोंदणी करावी लागेल. २५० रुपये शुल्क भरावे लागेल. खासगी हॉस्पिटलांना प्रत्येक लसीमागे १५० रुपये भरावे लागतात. त्यामुळे जशी नोंदणी होईल, त्या प्रमाणात ते लस मागवतात. ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी सुरू असलेले लसीकरण यापुढेही सुरूच राहील, असे डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.

लस येथे असेल उपलब्ध…

-काणकोण, कुडचडे, पेडणे, वाळपई, हळदोणा, बाळ्ळी, बेतकी, डिचोली, कांदोळी, कांसावली, कासारवर्णे, चिंचिणी, कोलवाळ, खोर्ली, कुठ्ठाळी, कुडतरी, लोटली, मडकई, केपे, उसगाव, सांगे, साखळी, शिरोडा, शिवोली, धारबांदोडा, फोंडा, पर्वरी, मये येथील आरोग्य केंद्र.
-म्हापसा जिल्हा हॉस्पिटल, वास्को, मडगाव आणि पणजी येथील सरकारी हॉस्पिटल.
-दोना पावल येथील मणिपाल हॉस्पिटल, मळा हेल्थे वे, अपोलो मडगाव, व्हिजन म्हापसा, म्हार्दोळकर हॉस्पिटल डिचोली, सावईकर हॉस्पिटल फोंडा ही खासगी हॉस्पिटल.

दोन्ही डोस घेतल्यानंतरही मार्गदर्शक तत्त्वे पाळा

गोवा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दिशेने जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रसारासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनीही मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केले.

हेही वाचा – गोव्यात बुधवारी २०० नव्या कोरोना रुग्णांचं निदान तर महाराष्ट्रात २००पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोव्यातही बाधितांचे प्रमाण वाढतच चालले आहे. यातून गोवा दुसऱ्या लाटेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी स्वत:हून करोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, सण, उत्सव घरांत राहून साजरे करणे आणि लसींचे दोन डोस घेतल्यानंतरही मार्गदर्शक तत्त्वे पाळणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. बोरकर म्हणाले.

राज्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे लसींसाठी नोंदणी केली जात आहे. आरोग्य केंद्रे तसेच इस्पितळांत १० टक्के ऑनलाईन नोंदणी करून घेतली जात आहे. सरकारी इस्पितळांत दिली जाणारी लस मोफत मिळते. त्यामुळे गोमंतकीयांनी तत्काळ दोन्ही डोस घ्यावे आणि करोनावर मात करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात आतापर्यंत १,१४,८०८ डोस

राज्यात आतापर्यंत कोविशिल्ड लसीचे १,१४,८०८ डोस देण्यात आले आहेत. १६,६८५ आरोग्य कर्मचारी, ११,६४५ फ्रंटलाईन कर्मचारी, ४५ वर्षांवरील ११,१४१ व ६० वर्षांवरील ५७,६९९ नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. यांतील ९७,१७९ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर १७,६२९ जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, अशी माहितीही डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.

बुधवारी एका दिवसात राज्यात तब्बल दोनशे नवे कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ माजली आहे. गेले काही दिवस बाधितांचा आकडा दीडशेपर्यंत जात होता. पण बुधवारी तो दोनशे झाल्याने गोमंतकीयांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

दोनशे नव्या बाधितांसह बुधवारी एका बाधिताचा मृत्यू झाला. तर ६२ जण कोरोनातून मुक्त झाले. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या १,५५६ वर गेली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने कोरोना चाचण्यांत वाढ केली आहे. बुधवारी २,३५२ चाचण्या करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या वाढत आहे. पण बरे होणाऱ्यांची संख्या घटत असल्याने राज्यातील बाधित बरे होणाऱ्यांची टक्केवारीही कमी होऊन ९५.८९ टक्क्यांवर आली आहे.

कुठे किती रुग्ण?

राज्यातील मोठ्या शहरांतील बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. सद्यस्थितीत राजधानी पणजीत १६५, मडगावात १७३, फोंड्यात १२१, पर्वरीत १३०, वास्कोत १०८, कांदोळीत ११४ सक्रिय बाधित आहेत. याशिवाय इतर काही ठिकाणी ५० पेक्षा अधिक सक्रिय बाधित आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गोमंतकीय तसेच पर्यटकही करोना मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करत आहेत. सण, उत्सव, पार्ट्या, धार्मिक कार्यक्रमांसाठी ते मोठ्या संख्येने एकत्र जमत आहेत. त्यामुळेच राज्यातील बाधितांनी पुन्हा द्विशतक गाठले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात राज्यात भीषण संकट ओढवणार आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

बाधितांचे प्रमाण घटल्याने दोन्ही जिल्ह्यांतील कोविड केअर सेंटरमधील खाटाही गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होत्या. उत्तर गोव्यातील बाधित घरीच विलगीकरणाचा पर्याय स्वीकारत असल्याने उत्तरेतील सेंटर्समधील २७५ खाटा अजूनही रिकाम्याच आहेत; पण दक्षिण गोव्यातील ६० पैकी ३७ खाटा भरलेल्या असून, २३ खाटा रिक्त असल्याचे आरोग्य खात्याच्या दैनंदिन अहवालातून स्पष्ट झाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!