CORONA UPDATE | पुढील 24 तासात निर्णय

मुख्यमंत्र्यांची केरी चेकपोस्टला भेट, परराज्यातून गोव्यात येणाऱ्या गाड्यांचा घेतला जाणार आढावा

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः सरत्या दिवसांसोबत राज्यातील करोनाची परिस्थिती हाताबाहेर चाललीये. कोरोना बाधितांचा रोजचा आकडा हजाराच्या घरात पोहोचलाय. त्याचसोबत मृत्यांची संख्यादेखील हळुहळू वाढत चाललीये. या वाढत्या कोरोनाच्या  उद्रेकावर नियंत्रण आणण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ‘नाईट कर्फ्यू’ लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी बुधवारी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तसंच बुधवारी रात्री त्यांनी सत्तरीतील केरी चेक पोस्टला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

बाहेरून राज्यात येणाऱ्या वाहनांची होणार नोंद

महाराष्ट्र तसंच कर्नाटक भागातून असंख्य गाड्यांची राज्यात रोज ये-जा सुरू असते. राज्यात कोविडची वाढती प्रकरणं पाहता, राज्याच्या सीमा भागातील चेक पोस्टवर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. गुरुवारच्या दिवशी परराज्यातून गोव्यात येणाऱ्या वाहनांची चेक पोस्टवर नोंद करण्यात येणार आहे. या आधारावर अभ्यास करून त्यांना कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट बंधनकारक करायचं की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

गुरुवारपासून राज्यात ‘नाईट कर्फ्यू’

राज्यात लॉकडाऊनची अजिबात अंमलबजावणी केली जाणार नाही. ‘नाईट कर्फ्यू’चा कालावधी वगळता सर्व प्रकारची दुकानं, मॉल्स सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी दुकानांवर गर्दी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. करोनाची दुसरी लाट राज्यात दाखल झालीये. त्यामुळे दिवसभरातील बाधितांच्या संख्येने दीड हजारांचा टप्पाही ओलांडलाय. करोनामुळे अनेकांचा मृत्यू होतायत. त्यामुळे गोमंतकीयांतील भीती वाढत चाललीये. ही परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठीच सरकारने सर्वच आमदार, मंत्र्यांना विश्वासात घेऊन निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतलाय.

नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

करोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून मास्क, शारीरिक अंतर तसंच सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक स्थळांवर गर्दी करणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं, गरज नसताना रस्त्यांवर फिरणं आदी प्रकार बंद होणं गरजेचं आहे. सार्वजनिक स्थळांवरील गर्दी रोखण्यासाठी गुरुवारपासून जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!