कोरोना बळींचा आकडा ८००च्या उंबरठ्यावर

राजधानीत ७७ रुग्ण; सक्रिय रुग्णांचा आकडा ६७५ वर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोरोनाविषाणूचे महासंकट दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना बळींचा आकडा ७९९ झाला आहे. मार्च महिन्यात पणजीतील कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होत आहे. पणजी शहरातील आकडा ७७ झाला आहे. रुग्ण बरे होण्याबरोबरच नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढत असून सक्रिय रुग्णांचा आकडा ६७५वर पोहोचला आहे.

कोरोना रुग्ण मिळण्याचं प्रमाण धोकादायक

दरम्यान, कोरोना रुग्ण मिळण्याचं प्रमाण कमी असलं तरी त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक आहे. २८ फेब्रुवारीला पणजीतील कोरोनाबाधितांची संख्या ४७ होती ती वाढून शुक्रवारी ७७ झाली आहे. मागील पाच दिवसांत पणजीत ३० रुग्णांची भर पडली आहे. मडगावात सर्वाधिक जास्त ९८ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान मडगाव, चिंबल आणि पणजी या तीन शहरांत अनुक्रमे ५० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. चिंबलमध्ये ५७ तर काणकोण, फोंडा, पर्वरी, वास्को या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचा आकडा हळुहळू वाढत आहे. मागील महिन्यात २८ फेब्रुवारी रोजी सक्रिय रुग्णांचा आकडा ६०६ होता, तो आता ६७५ झाला आहे. तीन दिवसांपूर्वी सक्रिय रुग्ण ६०० हून कमी होते त्यात दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जुने गोवेतील रुग्णाचा मृत्यू

जुने गोवे येथील ४३ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे शुक्रवारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे ७९९ कोरोनाबाधित दगावले आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ७९ नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंत राज्यात कोरोनाचे ५५,२९१ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ५३,८१७ रुग्ण बरे झाले तर ६७५ सक्रिय रुग्ण आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!